Badlapur case Akshay shinde News : बदलापूरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात अटेकत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने आधी पोलिसाकडील बंदूक हिसकावली, त्यानंतर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. मात्र, अक्षय शिंदेच्या आईने पैसे घेऊन मुलाला मारल्याचा आरोप केला आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना अक्षय शिंदेच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले.
चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदेची आई काय म्हणाली?
"अक्षय शिंदेला तुम्ही का घेऊन येत नाही, असे पोलिसांना बोलले, त्यावेळी पोलीस म्हणाला, 'अक्षय शिंदेला इथं बघितलं तर मारून टाकतील. मारून टाकतील म्हणून त्याला घेऊन यायला माणसं लागतात. त्याचा रिपोर्ट मोठा आहे', असे बोलत होते ते. मी पोरासोबत बोलले पण, पोरगा बोलला की मम्मी चार्जशीट पण आलेली नाही. मला केव्हा सोडवता? मी बोलले बाबा थांब जरा बघू आपण", असे अक्षय शिंदेच्या आईने सांगितले.
"त्याच्या हातामध्ये कुठले तरी पेपर होते, त्याला लिहून दिलेले. तो दाखवत होता मला. पण, मला काही समजत नाही. आम्ही शिकलेले नाही. मी बोलले पोराला मला वाचता येत नाही. पैसे देऊन मारून टाकलं माझ्या पोराला. मला भरपाई करून द्या. नाहीतर आम्ही तिथे येऊ, आम्हाला पण गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार आहे", असे अक्षय शिंदेची आई म्हणाली.
"तसं केलं असतं, तर माझं पोरगं शाळेत गेलं नसतं"
"माझा पोरगा असं करू शकत नाही. पैसे देऊन माझ्या पोराला मारून टाकलंय. मी वाट बघतेय माझं पोरगं केव्हा निघेन. माझं पोरग असं करू नाही शकत. त्याच्यावर आरोप टाकून नेलेलं आहे. शाळेत दुसरं कुणीतरी केलेलं आहे. तसं केलं असतं तर माझं पोरगं शाळेत गेलं नसतं कामाला", असा दावा अक्षय शिंदेच्या आईने केला.
"त्या बायांना का धरत नाही?"
"आम्ही त्याला घाण सवय लावलेली नव्हती. आम्हाला पण गोळ्या घालून मारावं त्या लोकांनी; आता आम्ही पण त्याच्या बरोबर मरणार. शाळेत ६ बायका आहेत. त्यातील बायका पळून गेल्या, त्यांना का धरत नाही?", असे मयत आरोपी अक्षय शिंदेची आई म्हणाली.