भिवंडी : शहरातील नारपोली भागातील ७२-गाळा परिसरात यंत्रमाग कामगाराची अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. विनी डाइंग या कंपनीजवळ अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या टेरेसवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत या कामगाराचा मृतदेह सापडला.संतराम जयस्वाल (४२) असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव असून तो बालाजीनगर येथे राहत होता. शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमाराला संतराम यांचा मृतदेह ७२-गाळा परिसरातील एका इमारतीच्या टेरेसवर आढळून आला. मारेकऱ्याने धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा गळा चिरला. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह टेरेसवर पडला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह जाळून मारेकरी पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी कामगाराचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी रु ग्णालयात दाखल केला आहे. या हत्येप्रकरणी संतराम याचा मोठा भाऊ पंचराम जयस्वाल (४५) याने भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुजारी करत आहेत.
यंत्रमाग कामगाराची गळा चिरून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 12:49 AM