अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात निविदा प्रक्रियेवरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले आहेत. आज आमदारांनी बोलावलेल्या बैठकीत एका माजी नगरसेवकांने पालिका अधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त करताना 'निविदांवरून आता हत्या होणे बाकी राहिले आहे' असा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले.
आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी शहरातील प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहरातील कचऱ्याची समस्या आणि पथदिव्यांवरील विजेची समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही चर्चा सुरू असतानाच सध्या अंबरनाथ पालिकेने काढलेल्या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने त्यावर पालिका प्रशासनाने तोडगा काढावा अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली.
मात्र लहान कामांच्या ज्या निविदा काढण्यात आल्या आहेत, त्या निविदा कोटेशन बेसवर असल्यामुळे वार्षिक मंजूर दरापेक्षा कमीच दराने ते काम करण्यावर प्रशासन ठाम राहिल्याने माजी नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात चांगलीच जुंपली होती. मंजूर वार्षिक दर हे जुने असल्याने ते दर मान्य नसल्याचे माजी नगरसेवकांनी प्रशासनाला खडसावून सांगितले. हा वाद सुरू असतानाच माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी निविदा प्रक्रियेवरून आता केवळ हत्या होण्याचे बाकी राहिले आहे असे म्हणत आपला संताप व्यक्त केला. यावर आमदार किणीकर यांनी देखील हस्तक्षेप करत अशी परिस्थिती अंबरनाथ पालिकेत निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने देखील प्रयत्न करावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान अंबरनाथच्या राजकारणात वादावादीमुळे हत्या घडल्याच्या अनेक घटना घडलेल्या असतानाच आता निविदा प्रक्रियेवरून हत्येची घटना घडण्याची शक्यता वर्तवल्याने पालिका प्रशासन आणि माजी नगरसेवक यांच्यात देखील आता काहीशी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- शहरात कचऱ्याची समस्या बिकट असून पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात बिलावरून वाद असेल तर पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला ढोल ताशाच्या गजरात आमंत्रित करून त्याचे सर्व बिल द्यावे. मात्र शहरातील कचरा स्वच्छ करावा अशी मागणी आमदार किणीकर यांनी केली.
- शहरात मोठे प्रोजेक्ट होत असताना लहान कामाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे याबाबत पालिका अधिकाऱ्याने लक्ष द्यावे आणि लहान समस्या सोडवण्यावर भर द्यावा असेही किणीकर म्हणाले.