वासिंद : वासिंद शहरासह तालुक्यातील काही ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पथदिव्यांची वीज जोडणी बंद करण्यात आल्याने नागरिकांना अंधारात ये-जा करावी लागत आहे.
वासिंद शहरातील व इतर मुख्य रस्त्यांवर हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. तसेच शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या पथदिव्यांचा सध्या वीजपुरवठा खंडित केल्यामुळे परिसरात अंधार आहे. या ग्रामपंचायतीचे वीजबिल जिल्हा परिषद विभागाकडून भरण्यात आलेले नाही. ऐन उन्हाळ्यात काही नागरिक रात्री बाहेर पडत असतात, तसेच काही कामानिमित्त ये-जा करीत असतात. परंतु या रस्त्याजवळील दिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा व कार्यालय वीजबिल वेळोवेळी भरण्यात आलेले आहे. परंतु या पथदिव्यांचा भरणा गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेकडून भरला जात नव्हता. दरम्यान, पूर्वसूचना किंवा वीजबिल न देता अचानक हा पुरवठा बंद करण्यात आला असून, यासंदर्भात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे वासिंद ग्रामपंचायतीचे सदस्य वासुदेव काठोळे यांनी सांगितले.