ठाणे : ठाण्यासाठी आशेचा किरण घेऊन आलास, दीन, दुबळे, ज्येष्ठ श्रेष्ठांचा आधार झालास. कृतज्ञ आहोत आम्ही तुझे सर्व ठाणेकर ! कोविड योद्धा म्हणून तू सत्काराला पात्र ठरलास, अशा शब्दांत अत्रे कट्ट्याने कोरोना योद्धा, दिग्दर्शक किरण नाकती यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला. यावेळी त्यांना कट्ट्यातर्फे मदतनिधी म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले.
‘देणे समाजाचे’ या कार्यक्रमात नाकती यांचा सन्मान आणि संवाद हा कार्यक्रम बुधवारी झुमवर आयोजिला होता. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्ष शीला वागळे यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कोरोना काळातील प्रवास उलगडला. कोरोना हा खोटा आहे, अफवा आहे, हा गैरसमज लोकांनी मनातून काढून टाकला पाहिजे. मी स्मशानात जाऊन कितीतरी कोरोनाबाधित मृतदेहांचे दशक्रियाविधी आणि अस्थीविसर्जन करत आहे. त्यामुळे घरीच रहा आणि कोरोनाचे सर्व नियम पाळा, असे आवाहन नाकती यांनी संवादादरम्यान जनतेला केले. सामाजिक कार्य करताना कोणाचा आदर्श समोर ठेवला, हे सांगताना नाकती यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून शिकलो. समाजकार्य जास्त आणि राजकारण कमी, असे काम केले पाहिजे. त्यामुळे डोळ्यांसमोर त्यांचाच आदर्श होता. यावेळी कट्ट्याच्या संपदा वागळे यांनी त्यांचा परिचय करून दिला.
--------