डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री आ. रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत महापालिकेच्या स्मार्ट अॅपवर तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कौस्तुभ लेले यांनी कचरा प्रश्न व रस्त्यावर पांढरे पट्टे आखण्याबाबत अॅपवर तक्रार केली, परंतु आठवडा लोटला तरीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. महापालिकेची बेपर्वाई ही शोकांतिका असल्याचे मत लेले यांनी व्यक्त केले.लेले हे महात्मा फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेसमोरील एका इमारतीत वास्तव्याला आहेत. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी प्रभागातील कचरा कुंडीच्या समस्येसंदर्भात आणि दुतर्फा वाहनांची वर्दळ दिवसरात्र सुरु असल्याने रस्त्यांवर दिशादर्शक पांढरे पट्टे आखण्याबाबत अॅपवर तक्रार नोंदवली. त्यास आठवडा उलटून गेला तरी महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. महापालिकेच्या नाकर्त्या अधिकाºयांना लोकांच्या तक्रारींची दखल घ्यायचीच नसेल तर अॅप बनवलेच कशाला, असा सवाल त्यांनी केला. लेले म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट केडीएमएसी या अॅपला असलेले रेटींग हे १.९ एवढे कमी दर्जाचे आहे. त्यामुळे आपल्या शहरांची प्रगती कासवगतीने होणार असून ते योग्य नाही. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान यायला हवे. दक्ष नागरिक समितीच्या आवाहनानुसार नागरिकांनी अॅपवर तक्रारी केल्या आणि त्याची आठवडा आठवडा दखल घेतली गेली नाही तर उपयोग काय, असे लेले म्हणाले.लेले म्हणाले की, आठ दिवसांपूर्वी तक्रार करुनही ती मिळाल्याची पोचपावती मिळालेली नाही. आपली तक्रार पेडींग एवढेच दाखवत आहे. महापालिकेच्या अशा ढिम्म कारभाराबाबत काय बोलायचे, असा सवालही त्यांनी केला.महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेसंदर्भात या महिन्यात अॅपद्वारे आलेल्या १२०३ तक्रारींचे आम्ही तातडीने निराकरण केलेले आहे. तक्रार, सूचना मिळाल्यावर साधारण ४८ तासांच्या आत त्याचे निराकरण व्हावे, अशा स्पष्ट सूचना आम्ही स्वच्छता निरीक्षकांना दिलेल्या आहेत. लेले यांच्या तक्रारीची माहिती घेतो आणि त्यांचेही निराकरण निश्चितच केले जाईल. रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे हे मात्र अन्य विभागाकडे असून त्यासंदर्भात माहिती मला माहिती देता येणार नाही. - उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विभाग
‘स्मार्ट केडीएमसी’वरील तक्रारीला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:46 PM