संदीप प्रधानठाणे : भाजपचा राम अर्थात माजी खासदार व केंद्रीय मंत्री राम नाईक आणि माजी खासदार व आता अलीकडेच शिंदेसेनेत प्रवेश केलेले अभिनेते गोविंदा यांच्यातील संघर्ष जुना आहे. २००४ मध्ये इंडिया शायनिंग, फील गुड फॅक्टरच्या लाटेवर तत्कालीन वाजपेयी सरकार लोकसभा निवडणुकीला सामोरे जात होते. राम नाईक हे त्या सरकारमधील मंत्री होते. नाईक यांच्याविरोधात अभिनेता गोविंदाला काँग्रेसने उमेदवारी दिली. सुरुवातीला नाईक यांनी हा ‘नाच्या’ फार तर कंबर हलवून दोन-चार ठुमके मारण्यापलीकडे काय प्रभाव पाडणार? असा पवित्रा घेतला होता. मात्र, जेव्हा प्रचार सुरू झाला, तेव्हा गोविंदाने मतदारांचे मन काबीज केल्याने मग भाजपच्या उमेदवारालाच नाचवायला सुरुवात केली. नाईक यांनी गोविंदावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन मागायला नाईक गेले असता, अर्जाच्या तीन प्रती आणल्या का? असा टोला ठाकरे यांनी नाईक यांना लगावला. मंत्री असताना नाईक यांनी शिवसैनिकांची कामे केली नसल्याची नाराजी ठाकरे यांनी व्यक्त केली.
त्या निवडणुकीत झालेला पराभव आपल्या कामांमुळे सतत विजयश्री खेचून आणणाऱ्या नाईक यांच्या वर्मी लागला. गोविंदाने शिंदेसेनेत प्रवेश करताच पुन्हा भाजपचा हा राम हिरीरीने मैदानात उतरला व गोविंदाच्या दाऊद संबंधाचे आरोप उगाळू लागला. परंतु, गोविंदा लोकसभेच्या मैदानात उतरणार नसल्याचे आता हळूहळू स्पष्ट होतय. अर्थात राम विरूद्ध गोविंदा संघर्ष अजरामर आहे.