मुरलीधर भवार
ठाणे लोकसभा मतदारसंघ जनसंघाच्या काळापासून आणि नंतर भाजपला अनुकूल होता. शिवसेना जोमात आली, तेव्हा आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातून खेचून घेतला. ठाणे मतदारसंघातून प्रकाश परांजपे चारवेळा निवडून आले. त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे निवडून आले. लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले, तेव्हा कल्याण लोकसभेतून थेट निवडणुकीत आनंद परांजपे निवडून आले. शिवसेनेच्या राजकारणात आनंद यांची घुसमट होऊ लागल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. ही खेळी शरद पवारांची होती.
डोंबिवलीत ब्राह्मण मतदारांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. या मतदारसंघातून ब्राह्मण चेहरा देण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी खेळली. २०१४ साली आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. परांजपे यांच्या प्रचारासाठी कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात १६ एप्रिल २०१४ रोजी शरद पवार यांच्या प्रचार सभेचे आयाेजन केले होते. पवार यांनी भाषणात रा. स्व. संघावर टीका करण्याच्या ओघात ‘हा देश हाफ चड्डीवाल्याच्या हाती देणार का?’ असा सवाल केला. ब्राह्मण कार्ड खेळून परांजपे यांना संघाची मते मिळतील या स्वत:च्या राजकीय खेळीवरच पवार यांनी बोळा फिरवला. पवार यांचे ते भाषण परांजपे यांच्या विजयासाठी बाधक ठरले. त्यानंतर आजतागायत परांजपे यांना पुन्हा लोकसभा निवडणुकीची संधी मिळालेली नाही.