प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चटके सर्वसामान्यांना बसत असताना दरवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जानेवारी २०१८ ला एक लिटर पेट्रोल ७७ रुपये ८७ पैसे दराने मिळत होते. तो दर आजच्या घडीला १०५ रुपये २४ पैसे झाला आहे. डिझेल तेव्हा ६३ रुपये ४३ पैसे दराने मिळत होते. आता ते ९६ रुपये ७२ रुपये दराने मिळत आहे. या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे किराणा मालासह भाजीपालाही महागल्याने आम्ही जगायचे तरी कसे? असा प्रश्न गृहिणींकडून विचारला जात आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला असताना महागाईमुळे सर्वसामान्यांची चिंता अधिक वाढली आहे. पैसा आणायचा तरी कोठून, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. जानेवारी २०२१ पासून तर दरवाढीचा सिलसिला कायम आहे. त्याचा परिणाम अन्य साहित्यावर पडत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढ चालूच राहिल्याने वाहतुकीचा खर्च वाढून भाजीपाला महागला आहे. सध्या सर्व भाज्यांचे भाव ८० ते १६० च्या दरम्यान झाले आहेत; तर किराणा मालाचे भावही वधारल्याने सर्वसामान्य गृहिणींची पंचाईत झाली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष इंधन दरवाढीविरोधात आंदोलने आणि निषेध मोर्चे काढत आहेत; तर राज्यात विरोधी पक्षात आणि केंद्रात सत्तेत असलेली भाजप इंधन दरवाढीबाबत महाविकास आघाडीला दोष देत आहे. राजकीय पक्षांच्या या आरोप-प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
-----------------------------------------------------
असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
जानेवारी २०१८ - पेट्रोल ७७.८७, डिझेल ६३.४३
जानेवारी २०१९ - पेट्रोल ७४.४४ डिझेल ६५.७३
जानेवारी २०२० - पेट्रोल ७८.६२ डिझेल ७२.५९
जानेवारी २०२१ - पेट्रोल ९२.८४ डिझेल ८३.२८
फेब्रुवारी - पेट्रोल ९७.५५ डिझेल ८८.५८
मार्च - पेट्रोल ९७.१९ डिझेल ८८.२०
एप्रिल - पेट्रोल ९६.८३ डिझेल ८७.८१
मे - पेट्रोल ९९.९४ डिझेल ९१.८७
जून - पेट्रोल १०४. ९० डिझेल ९६.७२
जुलै - पेट्रोल १०५.२४ डिझेल ९६.७२
--------------------------------------------------------
ट्रॅक्टर शेती महागली
बदलत्या काळानुसार ट्रॅक्टर या तंत्रज्ञानाचा शेतीत वापर वाढला. लवकरात लवकर कामे उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करतात. डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालविणे जड जात आहे. भाडे वाढल्याने भाड्यावर ट्रॅक्टर घेऊन मशागत, नांगरणी, पेरणी करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बैलजोडीचा वापर करीत मशागतीची आणि अन्य कामे सुरू केली आहेत. वाढत्या दरवाढीचा फटका बळिराजालाही बसला आहे.
----------------------------------------------------------
भाजीपाल्यांचे दर
फरसबी - १६० रुपये किलो
वाटाणा - १६० रुपये किलो
भेंडी - ८० रुपये किलो
वांगे - ६० रुपये किलो
वाटाणा - १६० रुपये किलो
------------------------------------------------------------
डाळ, तेलही महाग
किराणा वस्तूंमध्ये डाळीच्या भावात ९०, १००, ९६, १२० असे चढउतार होत असून, तेलाचे दर एका लिटरमागे १६१ ते १३२ रुपयांदरम्यान पोहोचले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. तेलाशिवाय भाजी होऊ शकत नाहीत. त्यामुळे गरज म्हणून गृहिणींना तेल खरेदी करावेच लागते. दुसरीकडे, भाजीपालाही महागल्याने एकूणच स्वयंपाकघरात महागाईचा भडका उडाल्याचे दिसत आहे.
------------------------------------------------------
सरकारने दिलासा द्यावा
महागाई इतकी वाढली आहे की, जगायचे कसे असा प्रश्न उभा राहिला आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने सध्या पैशांची काटकसर सुरू आहे. त्यात इंधन, भाजीपाला, किराणा साहित्यामध्ये झालेल्या दरवाढीमुळे संसाराचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागत आहे. केंद्र असो अथवा राज्य; सरकारने या महागाईवर अंकुश ठेवून सर्वसामान्यांना दिलास द्यावा, ही विनंती.
- सुनीता चौधरी, गृहिणी
----------------------------------------
सर्वसामान्यांनी खायचे काय !
एकीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढ त्याचबरोबर भाजीपाला आणि किराणा माल महागल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी खायचे काय? कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हिरव्या पालेभाज्या खावा आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढवा असे सल्ले डॉक्टर देत आहेत. वाढत्या महागाईत किराणा माल सोडाच; पण भाजीपाला खरेदी करणेही मुश्कील झाले आहे.
- कमल सावंत, गृहिणी
------------------------------------------
महागाईने आमचेही नुकसान
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. बाहेरून कल्याणमध्ये येणारा शेतीमाल हा खर्च वाढल्याने महाग हाेत आहे. याचा फटका भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बसत आहे. लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने भाज्यांचे भाव स्थिर नाहीत. सध्याच्या निर्बंधांमध्ये भाजीपाला विक्री करण्यास वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याचाही परिणाम मालाच्या विक्रीवर झाला आहे.
- गणेश पोखरकर, व्यापारी
------------------------------------------
मोजक्याच किराणा मालाची खरेदी
वाढत्या महागाईमुळे महिन्याच्या किराणा यादीलाही काही प्रमाणात कात्री लागली आहे. महागाईमुळे ग्राहक मोजकाच व आवश्यक तेवढाच किराणा माल खरेदी करीत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात आधीच व्यवसायाचे कंबरडे मोडले असताना आता महागाईचा फटका बसला आहे.
- दिनेश चौधरी, किराणा व्यापारी
-------------------------------------------------------------