ठाणे: प्रदुषणविरहीत दिवाळीसाठी उपयुक्त, भारतीय बनावटीचे, तेलाची बचत करणारे, कुंभारांना रोजगार देणारे सौरऊर्जेवर चालणारे पर्यावरणपुरक ‘सोलार मॅजिक दिवे’ यंदाच्या दिवाळीनिमित्त काईट टेक संस्थेने तयार केले आहेत. चीनी बनावटीच्या दिव्यांवर बहिष्कार घालण्यासाठी आणि मेक इन इंडियाला पाठबळ देण्यासाठी हे दिवे तयार केले असल्याची माहिती काईट टेकच्या संस्थापिका रश्मी बोथरा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बोथरा यांनी मुंबई, ठाणे परिसरात विविध ठिकाणी सोलार दिवे तयार करण्याच्या कार्यशाळा घेतल्या असून यात प्रामुख्याने अपंग, गरजू महिला, ग्रामीण भागांतील विद्यार्थी व विशेष मुलांना याचे प्रशिक्षण दिले. ठाणे व पुणे याठिकाणी मिून १० हजार दिवे १२५ लोकांनी तयार केले आहेत. येत्या दिवळीसाठी दोन लाख दिवे तयार करण्याचा मानस बोथरा यांनी व्यक्त केला. आॅन - आॅफ प्रकारचा दिवा, फुंक मारल्यावर, टाळी वाजवल्यावर, हात लावल्यावर बंद चालू होणारा सोलार मॅजिक दिवा, मॅग्नेटिक स्टॅण्डवर ठेवल्यास पेटणारा दिवा, सजविलेला बाऊलचा मॅग्नेटीक स्टॅण्डवरचा दिवा असे चार प्रकारांचे दिवे बनविले असून या दिव्यांमधील तंत्रज्ञान हॉटेल सारख्या ठिकाणी किंवा सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध वस्तूंसाठी वापरता येते असे विकल चौरासीया यांनी सांगितले. मातीच्या दिव्यावर सोलार पॅनल वापरले असून या दिव्यात वापरली गेलेली बॅटरी दिवसभर उन्हात ठेवल्यावर चार्ज होते आणि रात्री हा दिवा वापरु शकतो. कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त आठ तास हा दिवा राहू शकतो. दोन वर्षांचे आयुर्मान या दिव्याचे आहे. हा दिवा नाईट लँप, टॉर्च म्हणूनही वापरता येऊ शकतो असे चौरासीया यांनी सांगितले. काईट टेक संस्था भविष्यात सोलार व्हीलचेअर आणि सोलार फिजिओथेरपी बनविणार असल्याचे बोथरा यांनी सांगितले.
काईट टेक संस्थेने तयार केले यंदाच्या दिवाळीसाठी ‘सोलार मॅजिक दिवे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 4:27 PM
प्रदुषणविरहीत दिवाळी साजरी करण्यासाठी काईट टेक संस्थेने ‘सोलार मॅजिक दिवे’ तयार केले.
ठळक मुद्देयंदाच्या दिवाळीसाठी ‘सोलार मॅजिक दिवे’सौरऊर्जेवर चालणारे पर्यावरणपुरक दिवेचीनी बनावटीच्या दिव्यांवर बहिष्कार घालण्यासाठी ‘सोलार मॅजिक दिवे’