ठाणे : पुस्तकांचे महत्त्व तरुण पिढीला कळण्यासाठी त्यांना इतिहासाची गोडी लावावी. आधुनिक पिढीवर टिका करताना त्यांचे प्रश्न सहानुभूतीपुर्वक समजून घ्यावे. तरुण पिढीला पुस्तकांचे महत्त्व कळण्यासाठी पुस्तकांना पुरस्कार देणे महत्त्वाचे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ व ‘ अॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार’ सोहळा पुस्तक आदान प्रदान महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात पार पडला.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले, ग्रंथांना पुरस्कृत करण्याचे धोरण मराठी ग्रंथ संग्रहालयाने स्वीकारले आहे. अॅड. वा. अ. रेगे साहित्य पुरस्कार हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार ग्रंथसंग्रहालयाच्यावतीने दिला जातो त्याला वेगळे महत्त्व आहे. सामान्य माणसाला चांगल्या पुस्तकाची निवड करता येईलच असे नाही. पुरस्कारांमुळे त्यांना चांगले पुस्तक निवडून ते वाचण्याची संधी मिळते असे मत डॉ. मोरे यांनी मांडले. अनुवादीत पुस्तकांबद्दल आपले मत मांडताना डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, अनुवाद करताना अनुवाद करणाºया लेखकाला परकाया प्रवेश करावा लागतो. हौस म्हणून अनुवाद करता येत नाही त्यासाठी अनेक परिश्रम घ्यावे लागतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अनुवादीका, लेखिका सुजाता गोडबोले म्हणाल्या, अनुवादाकडे गांभीर्याने पाहिल्यास त्यातून साहित्याचे आदान प्रदान होऊन आपली संस्कृती बळकट होईल. अनुवाद ही सोपी गोष्ट नसून अनुवाद करणाºयाचे नाव सर्वांत शेवटी असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकर, वासंती वर्तक, चांगदेव काळे आदी उपस्थित होते.----------------------------चौकटचरित्र-आत्मचरित्र : बहुरूपीणी : अंजली कीर्तने, कादंबरी : जीर्णोद्धार : संतोष हुदलीकर, कथा : चाहूल उद्याची : सुबोध जावडेकर, कविता : भातालय : नामदेव गवळी, अनुवाद : एसीएन नंबियार : वपाला बालचंद्रन, सुजाता गोडबोले, प्रवास : पुन्हा यांकीजच्या देशात : डॉ.अच्युत बन, पर्यावरण : वृक्ष - अनुबंध : प्रा. नीला कोर्डे, विज्ञान : या शोधाशिवाय जीवन अशक्य : डॉ. प्रबोध चोबे, बालविभाग : मिसाईल मॅन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम : एकनाथ आव्हाड, इतिहास : रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गुढगाथा : रवी आमले, आदींना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तर ललित विभागात ‘चांगभलं’, लेखक साहेबराव ठाणगे. ललितेतर विभाग ‘कापूस सरकीपासून सुतापर्यंत’, लेखक राजीव जोशी यांना अॅड. वा. अ. रेगे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.