ठाणे : तलावांचे प्रदूषण रोखण्याबरोबरच त्यातील पाण्याची गुणवत्ता योग्य ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेने आता हायटेक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, प्रशासनाने आता तलावांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात कचराळी तलावापासून करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांना रोजच्या रोज तलावातील पाण्याच्या गुणवत्तेची माहिती उपलब्ध होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात येत्या दोन महिन्यांत मासुंदा, उपवन आणि आंबेघोसाळे तलावांतही यंत्रणा बसवली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ३५ तलाव शिल्लक असून त्यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच तलाव सुस्थितीत आहेत. या तलावांचे क्षेत्रफळ ४० हेक्टर इतके आहे. आता शिल्लक राहिलेल्या या तलावांचे सुशोभीकरण, प्रदूषण नियंत्रणात ठेवणे आणि पाण्याची गुणवत्ता राखणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत. तलावांच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी बायो-प्रॉडक्टचा डोस नियमितपणे दिला जात असून त्याचबरोबर एरिएशन यंत्रणाही चालवली जाते. त्यामुळे २४ तलावांपैकी १८ तलावांमध्ये पाण्याची गुणवत्ता मागील वर्षीपेक्षा सुधारल्याची बाब पर्यावरण अहवालातून समोर आली होती.
असे असले तरी तलावांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पाण्याचे नमुने प्रशासनाकडून घेतले जातात आणि ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. परंतु, ही काहीशी अवघड प्रक्रिया असल्याने पालिकेला नियमितपणे त्यावर भर देता येत नव्हता. त्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेची माहिती दररोज उपलब्ध होत नसल्याने त्याठिकाणी तत्काळ उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होत नाही. परिणामी, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात अडचणी निर्माण होतात.
नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने आता तलावांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सुरुवातीला कचराळी तलावामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ती सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे प्रशासनासह नागरिकांना रोजच्यारोज पाणी गुणवत्तेची माहिती उपलब्ध होणार आहे.
तत्काळ उपाययोजना करणे होईल शक्यया यंत्रणेच्या माध्यमातून रोजच्यारोज एकाच वेळी सहा ठिकाणांहून तलावाचे पाणी शोषून त्याचे विश्लेषण करणार आहे. त्यामध्ये तलावात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण तसेच अन्य घटकांची माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती तत्काळ तलावाजवळ बसवलेल्या डिजिटल फलकावर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ही माहिती महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागालाही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे. ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसारित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानंतर, शहरातील मासुंदा, उपवन आणि आंबेघोसाळे तलावांतही ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली.