लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कॅन्सरशी लढाई केलेल्या आयुषीने बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या यशाची आणि संघर्षाची कहाणी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर तिला ठाणेकरांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विशेष म्हणजे ती ज्या महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाली, ते महाविद्यालय आता तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेणार आहे. शैक्षणिक जीवनात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावीच्या वर्षात एकामागून एक आलेल्या संकटांना सामोेरे जात आयुषीने यशाची उत्तुंग झेप घेतली. घरात वडिलांनी मुलगी म्हणून शिक्षण नाकारले असताना आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले असताना ती जिद्दीवर आणि संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहोचली. तिची ही कहाणी गुरुवारी प्रसिद्ध झाल्यानंतर मदतीचे अनेक हात पुढे आले. ज्ञानसाधना महाविद्यालयाने तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली असून त्यात खंड पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच, शिक्षणानंतर तिच्या नोकरीसाठीही प्रयत्न करू, असे आश्वासन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी दिले. शुक्रवारी ते आयुषीचा कौतुक सोहळा करणार आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत सागर साळवी, स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग यांनी मदतीचा हात पुढे केला. तसेच, आ. संजय केळकर यांनीही मदतीचे आश्वासन दिले.‘लोकमत’नेही केले कौतुक आयुषीच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आणि तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी बुधवारी आयुषीला लोकमत कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी तिचे कौतुक करून तिला आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, सहायक व्यवस्थापकीय संचालक राघवेंद्र शेठ, ठाणे जिल्हा ब्युरो चीफ नारायण जाधव, फिचर एडिटर महेंद्र सुके व इतर सहकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी आयुषीने सर्वांचे आभार मानले.
ज्ञानसाधना घेणार आयुषीच्या शिक्षणाची जबाबदारी
By admin | Published: June 02, 2017 5:33 AM