भिवंडी : आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील गरजू घटकांना न्याय देण्यासाठी केला तर ते खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानार्जनाचे फलित आहे, असे प्रतिपादन भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी केले. शनिवारी ते साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इंद्रपाल बाबूराव चौघुले विधी महाविद्यालयाच्या प्रथम पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष इंद्रपाल चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी डी. वाय. पाटील लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, सीटी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. यु. के. नंबियार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, राहनाळचे सरपंच राजेंद्र मढवी, ॲड. गणेश चौघुले, शशिकांत चौघुले, श्याम चौघुले आदी उपस्थित होते. विधी महाविद्यालयातून पदवी मिळवून तुम्ही न्याय देण्याच्या प्रक्रियेत प्रवेश करत आहात. या ज्ञानाचा चांगल्या कामासाठी उपयाेग करावा. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व थोर विधिज्ञ होते. त्यांनी समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयाेग केला, असे मत डॉ. आशिया यांनी व्यक्त केले.
इंद्रपाल चौघुले यांनी संस्थापक महादेव चौघुले यांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या नीती, नीतिमत्ता, चारित्र्य सोडून काम न करण्याच्या शिकवणीचे पालन आम्ही करीत असल्यानेच या कार्यात यशस्वी होता आले, असे त्यांनी सांगितले. संस्था विधी महाविद्यालय सुरू करून थांबणार नसून पुढे एलएलएम कॉलेज सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या प्रथम पदवी प्रदान सोहळ्यात तब्बल ४२ विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल गायकवाड, पंडित चौघुले फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या सुनैना घोडगावकर, महादेव चौघुले पदवी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनायक दहिवले यांच्यासह व्यवस्थापनाने विशेष मेहनत घेतली .