कल्याण - कोकण... नारळ-पोफळींच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारे. रोजगारासाठी मुंबई-उपनगरात स्थायिक झालेला कोकणातील माणूस आपल्या लाल मातीचा गंध विसरत नाही. मुंबईत जन्म घेतलेली आजची पिढीही कोकणातील आपल्या गावावर तेवढेच प्रेम करते. कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडीतील पोटे मैदानावर 19 ते 27 जानेवारी दरम्यान झालेल्या कोकण महोत्सवाने लाल मातीतील संस्कृतीला नवे कोंदण मिळाले. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड महोत्सवाचे स्वागताध्यक्ष होते.
पालखी मिरवणुकीने महोत्सव सुरू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील जाणनले येथील कलामंच, केळवली- लांजाचे शक्ती तुरा डबलबारी यांची शाहिरी, शिवचक्र तीर्थ दशावतारी नाटक, बायकोचा बैल मालवणी नाटक, परळचे डबल बारी भजन, मंगलागौर आदी कार्यक्रम झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. रविवारी शान कोकणची कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे विशेष आकर्षण होते. कुणकेश्वर मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली होती.
बिळवस (ता. मालवण) येथे शाळा सुरू करणारे माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पालव यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत कोकणातील सुपुत्रांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकणतील मेवा, मसाले, लोणचे, खाद्य पदार्थ यांना विशेष पसंती मिळाली. त्यातून बचत गटाच्या महिला व छोट्या व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल झाली.
कोकणच्या कला, कलावंत यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महोत्सवातून प्रयत्न केला. माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील सर्व कोकण रहिवासी संघ, संघटना, मंडळे, त्यांचे पदाधिकारी, कोकणातील माणूस महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आला याचा आनंद आहे. - संजय मोरे, अध्यक्ष, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान, कल्याण