ठाणे - कोकण मराठी साहित्य परिषदेकडून 24 मार्च रोजी स्थापना दिन साजरा करण्यात येतो. याच स्थापना दिनाचे औचित्य साधून यंदा ठाणे जिल्हयातील सर्व शाखांतर्फे ग्रंथव्यवहाराशी संलग्न असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीचा घरी जाऊन सत्कार करण्यात येणार आहे. तर ठाणे शहरातर्फे रविवार दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कोमसापच्या यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त लेखकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये कविता राजधानी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त कवी डॉ. महेश केळूसकर आणि कोकण साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. अनंत देशमुख यांचा समावेश आहे.
27 वर्षांपूर्वी 24 मार्च रोजी कोकणातील अनवाणी लेखक कवी आणि ग्रंथव्यवहाराशी संलग्न असलेल्या व्यक्तींसाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी एक व्यासपीठ म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आज ही संस्था वटवृक्षासारखी सुमारे 60 शाखांमध्ये विस्तारली आहे. ठाणे जिल्हयात यापैकी 6 शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो. यावर्षीही सर्व शाखा हा दिवस साजरा करणार असून या निमित्ताने ठाणे जिल्हयातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड या सहाही शाखांचे पदाधिकारी आपआपल्या शहरात राहणा-या एखाद्या ज्येष्ठ लेखक, कवी अथवा ग्रंथव्यवहाराशी संलग्न असलेल्या व्यक्तींचा सन्मान त्यांच्या राहत्या घरी जाऊन करणार आहेत.
तर ठाणे शाखेतर्फे यंदा एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे कोमसापचे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले यामध्ये ठाणे शाखेचे तब्बल आठ लेखक, कवी असून यांचा सन्मान खास पध्दतीने यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये कोकण साहित्य भूषण पुरस्कार विजेते डॉ. अनंत देशमुख, कविता राजधानी पुरस्कार विजेते डॉ. महेश केळूसकर, पत्रकार प्रशांत डिंगणकर, प्रा. दीपा ठाणेकर, आरती कुलकर्णी, तनुजा ढेरे, कॅप्टन वैभव दळवी, विकास वराडकर यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. कविता, आणि एकूणच साहित्य यांचा केंद्र बिंदू असलेल्या समाजातील पोलिस शिपाई, सीमेवर लढणारा जवान, शेतात राबणारा किसान, समाज घडविणारा शिक्षक या समाज घटकांच्या हस्ते हे सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती कोमसापच्या केंद्रीय प्रसार व प्रचार कार्यकारणीचे सदस्य कवी बाळ कांदळकर यांनी दिली आहे.