दी चित्रपट, चित्रपट संगीत आणि समाज यांचं एक अतूट नातं आहे. चित्रपटातला नायक-नायिका तत्कालीन समाजाचं, समाजव्यवस्थेचं, समाजातल्या बदलत्या संस्कृतीचं, राहणीमानाचं प्रतिविश्व उभं करत असतात़ दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद त्याकाळात लोकप्रिय नायक होते. त्यावेळी त्यांच्या राहणीमानाचा, संवादांचा विलक्षण परिणाम त्याकाळच्या समाजावर, समाजातल्या तरुणाईवर दिसून येत होता़ त्यानंतरच्या काळात शम्मी कपूर, जितेंद्र आदी नायकांचे परिणाम तरुणाईवर होऊ लागले होते़ राजेश खन्नाने आपल्या अदाकारीने त्याकाळातल्या तरुणतरुणींवर भुरळ पाडली आणि मग आला अँग्री यंग मॅन अमिताभ ज्याने स्वप्नाळूपणा, रोमँटिकपणा विसरायला लावून विलक्षण आक्रमकता तत्कालीन पिढीत परिवर्तित केली़
हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे अलीकडील काळात दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या जावयाने, धनुषने, गायलेलं कोलावरी डी हे गाजलेलं गाणं आणि हेच शीर्षक घेऊन डॉ़ छाया महाजन यांचा संस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला २२ ललित लेखांचा संग्रह ‘कोलावरी डी’़ ललित गद्य वाचकांमध्ये लोकप्रिय साहित्य प्रकार आहे़ लेखक आणि वाचकांत मित्रत्वाचं नातं जोडणारा सर्वसमावेशक, स्वागतशील आणि आल्हाददायक असा हा एक साहित्य प्रकार आहे. यात तत्त्वचिंतन, गूढगुंजन, आत्मनिवेदन असा अंतर्लक्षी भाग आहे. त्याचप्रमाणे भ्रमण, व्यक्तिदर्शन आणि स्मरणरंजन असा बहिर्लक्षी भागदेखील आहे.
जवळजवळ सर्वच सिद्धहस्त लेखकांनी या साहित्यप्रकारात लेखन केलेलं आहे. साहित्याव्यतिरिक्त अभिनयादी अन्य क्षेत्रात आपला ठसा उमटवून लेखन करणाऱ्यांनाही या साहित्यप्रकाराने साहित्यिक म्हणून मान्यता मिळवून दिलेली आहे. पत्रकार, संपादक, समीक्षक, प्रकाशक अशा साहित्यक्षेत्राशी संबंधित असणाºया मंडळींनी या क्षेत्रात विहार केलेला आहे. अनेक हौशी वाचक या साहित्यप्रकारात लिखाण करत आहे़ त्यामुळे अगदी कुणीही लिहू शकेल, अशा या साहित्यप्रकारात खूप मोठ्या प्रमाणावर निर्मिती झालेली आहे. जेजे वाटलं, आठवलं, पाहिलं, घडलं, दिसलं, भासलं तेते लिहून काढले की, ते ललित लेखन या सदरात गणले जाते़ हा साहित्यप्रकार लिहायला सोपा मानला जातो, मात्र या प्रकारात लिहिलेलं सर्वच लेखन साहित्याच्या पातळीवर पोहोचत नसलं, तरी ते सवंगही होत नाही. काही नवं काही जुनं जाणून घेण्याची वाचकांची मानसिकता, त्याचबरोबर वास्तवाशी संबंधित, फारसे गुंतागुंतीचे नसल्याने, ललित साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जाते़
प्रवासवर्णन, बालपणीच्या आठवणी, व्यक्तिचित्रण हे ललित लेखनाचे उपप्रकार आहेत. सहज सुचलं म्हणून या भावनेतून ललित लेखनाला सुरुवात झाली असावी, असं मानलं जात असलं तरी त्यात सहजता कमी होती. ओढूनताणून आणल्यासारखे लेखन होत असे. व्यक्तिचित्रे फारशी नव्हती़ मात्र, १९३९ साली प्रसिद्ध झालेल्या वि.द़ घाटे यांच्या ‘काही म्हातारे एक म्हातारी’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाने पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं़
दुसºया महायुद्धाचा शेवट आणि देशाची पारतंत्र्यातून सुटका या समाजावर दूरगामी परिणाम करणाºया घटनांनी देशात नवे वारे वाहू लागले, शासनव्यवस्था बदलली, अर्थव्यवस्थेत बदल होऊ लागले, समाजव्यवस्थेत बदलाचे वारे वाहू लागले, सर्वसामान्य माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात बदल होऊ लागले, मोकळेपणा आला, संवेदना व्यापक, सूक्ष्म झाल्या, सभोवताल आणि परिसराशी संवाद साधू लागल्या़ समाजाच्या सर्व थरांतून मोठ्या प्रमाणावर लिहिलं जाऊ लागलं आणि अर्थातच विपुलतेमुळे ललित गद्याची स्वतंत्र साहित्यप्रकारात गणना होऊ लागली़
ललित लेखनाने मुक्त अवकाश निर्माण केल्यामुळे इतर साहित्य प्रकारातल्या नामवंत साहित्यिकांनी वेगळा आत्माविष्कार म्हणून या साहित्यप्रकारात संचार केलेला आढळतो. यात इरावती कर्वे, दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ असे नामवंत साहित्यिक आहेत़ या साहित्यप्रकारातला गमतीदार भाग म्हणजे कथेच्या अंगाने ललित लेखन आणि ललित लेखनाच्या अंगाने जाणारी कथा़ माणदेशी माणसे ही व्यक्तिचित्रे कथेच्या अंगाने जाणारी तर गंगाधर गाडगीळांचे तलावातले चांदणे किंवा बिनचेहºयाची संध्याकाळ कथेच्या अंगाने जाणारे ललित लेखन आहे़ व्यक्तिचित्रे बव्हंशी कथा असतात, पण पुलंच्या व्यक्तिचित्रांची समाजावर अफाट मोहिनी घातलेली होती़
रवींद्र पिंगेंनी अनेक व्यक्तिचित्रं लिहिलेली आहेत आणि ती जवळपास २०० च्या आसपास आहेत, असा दावा त्यांनीच एका प्रस्तावनेत केलेला आहे़ पिंगेंच्या व्यक्तिचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे रोखठोकपणा़ व्यक्तिचित्रणात शिष्टाचार म्हणून गोडगोड, स्तुतीपर लिहिणे पिंगेंना मान्य नसावं आणि म्हणून ते खुबीदारपणे गुणांबरोबर अवगुणांवरही लिहीत असत़ ललित लेखनात अनिल अवचट, रश्मी कशेळकर, आशुतोष जावडेकर, दासू वैद्य अशी काही महत्त्वाची नावं आहेत़ याच परंपरेत ‘कोलावरी डी’च्या निमित्ताने पुढे आलेलं एक नाव डॉ. छाया महाजन आहे़
कोलावरी डी या गाण्याला तरुणाईने दिलेला अभूतपूर्व प्रतिसादाचा धागा पकडून लेखिकेने गेल्या चारपाच दशकांत चित्रपट संगीताच्या माध्यमातून समाजातल्या बदलांवर भाष्य कोलावरी डी या लेखात केलेलं आहे. निरीक्षण नोंदवलेलं आहे़ मुड मुडके ना देख, रमया वस्तावया, डम डम डिगा डिगा, इना मिना डिका, मेरा नाम चिन चिन चू अशी ५०-६० वर्षांपूर्वी लोकप्रिय उडती गाणी, बिनाका गीतमालाची वाट पाहत असणारी व त्यावर थिरकणारी मनं यातून लेखिका एका अभिजात संगीताच्या कालखंडाचा पट तर मांडते, बदलत्या संस्कृतीवरची निरीक्षणं नोंदवते. गाण्यात संगीत अतिमहत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे शब्दही़ शब्द, संगीतासह थेट मनात झपकन उतरतात़ हे सांगताना लेखिका, सामर्थ्य नुसत्या संगीताचं की तरुण वयाचं कळत नाही, असं जेव्हा म्हणते तेव्हा वाचकाच्या मनातही हे द्वंद्व नकळत तयार होऊ लागतं. या ललित लेखसंग्रहाचं आणि छाया महाजनांचं वैशिष्ट्य हे की, त्या आपल्या लेखनातून वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात़
आजची तरुण पिढी जेव्हा अभी ना जाओ छोडकर, पान खाये सैय्या किंवा तिसरी कसम अशा चित्रपटांतली जुनी गाणी ऐकतात, तेव्हा त्यांना ऐकू येणारं गाणं आणि मनात चालणारं गाणं यांची संगती सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर कळत-नकळत लागत राहते. लेखिका सांगते, त्याकाळात ठेका होता, ठुमका होता, मुरका होता, ताल होता़ घरात ज्येष्ठ असले तरी विनासंकोच पाय ठेका धरायचे़ शांत, तरल, ठेक्याचं, ठुमक्यांचं संगीत आणि अर्थवाही गीतरचना यामुळे गाण्याच्या अर्थात वाहून जाणं आणि संगीतात बुडून जाणं होतं़ असं असलं तरी काळानुसार अर्थवाही गीतरचनेत बदल झाला, संगीतात नवे प्रयोग होऊ लागले़ इना मिना डिकासारख्या गाण्यापासून इतर अनेक गाण्यातले चीत्कार, बोलीभाषेचे प्रयोग आती क्या खंडाला आणि याच परंपरेतलं कोलावरी डी.
लेखिका काळाला समकाळातल्या तरुणाईशी रिलेट करते़ अशी गाणी मनातल्या वातावरणाशी, गाण्यातल्या ओळींशी, नायक-नायिकांशी जोडताना ही गाणी ना गायकाची असतात, ना संगीतकाराची, ना गायकाची ती संपूर्णपणे श्रोत्यांची होतात. कोलावरी डी हे असंच गाणं आहे, असं सांगताना पण वुईथ ए डिफरन्स असं सूचित करतात़
आजही शाळा म्हटले की, सुट्यांचा काळ आनंदाच्या गावा जावे, असा असतो़ अशा सुट्यांमध्ये मुलांना छंद वर्गात, मग तो गाण्याचा, तबल्याचा किंवा अगदी क्रिकेटसारख्या खेळाचा असो, यात मुलांची सांस्कृतिक वाढ, मानसिक वाढ, शारीरिक वाढ, वैज्ञानिक दृष्टिकोन असे उद्देश असले तरी सुट्यांच्या आनंदातली निरामयता निसटून जात असते़. निसर्गाच्या सान्निध्यातलं सहज शिक्षण, त्यातला आनंद, सकारात्मकता, आत्मविश्वास यावर चार ओळींचा शेर सादर करताना लेखिका म्हणते, परिंदों को नही दी जाती तालीम उडानों की, वो खुद तय कर लेते है मंझिल आसमानों की। रखना है हौसला आसमान को छुने की, उसको नही होती परवा गिरने की़ऋतू परीक्षेचा या लेखात या काळात होणारी धडधड, घरच्यांची काळजी, अगदी परीक्षेला जाताना हातावर दही देणं इथपासून जसं या ऋतूत गुंगवतात, त्याचप्रमाणे या ऋतूूत येत चाललेला गढूळपणा - मग कॉपीपासून गुणवत्ता, सक्षमता, मूल्यमापन याकडे गांभीर्याने पाहता तसं, चिंता व्यक्त करतात़
बिनचेहºयाचा माणूस हा असाच एक आत्मशोध घेणारा लेख आहे़ आपल्या अवतीभोवती, पोलीस, ड्रायव्हर, कंडक्टर, तिकीटलाइनमधील मागचीपुढची माणसं, वेटर अशी अनेक माणसं असतात. त्यांचा चेहरा आपल्याला आठवत नाही. त्यांना अस्तित्व असतं, स्वत:चं आयुष्य असतं, सुखदु:ख सारं असतं, पण त्या चेहऱ्यांना एक वर्ग प्राप्त झालेला असतो. याच्या खोलात जाताना त्या आय, मी, माय, माईने या स्वकेंद्री, स्वमग्न अवकाशाच्या माध्यमातून यातून आपण कायकाय गमावत चाललोय, हे सहजपणे मांडतात, एखाद्या कवितेसारखं.्नङ्म२ँ१ं्न्र५@ॅें्र’.ूङ्मे- राजीव जोशी