कल्याणः आगरी कोळी समाज हा भूमिपुत्रांचा समाज आहे. भूमीपुत्र आज भूमिहीन होत चालला आहे. पण आमचे सरकार त्यांना भूमिहीन होऊ देणार नाही. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात दिली.पश्चिमेकडील लालचौकी परिसरातील या महोत्सवात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, आगरी समाज आक्रमक असतो असे नेहमीच बोलले जाते. पण हा समाज आक्रमकच नाही तर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसरदेखील आहे. कोळी समाजाची संस्कृती जगाला भुरळ पाडणारी आहे कोळ्यांचे समुद्राशी अनोखे नाते आहे. सातवाहन काळातही या आगरी कोळी समाजाने दिग्विजय नोंदविला होता. त्यामुळे या समाजाला एक इतिहास लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमाराची निर्मिती केली, त्यावेळेसही या समाजाचे मोलाचे योगदान लाभले होते, असेही फडणवीस म्हणाले. महोत्सव एक व्यासपीठ आहे. प्रगतीच्या ओघात वेगवेगळ्या व्यवसायात समाजाने पदार्पण केले असले, तरी अशा महोत्सवांच्या माध्यमातून परंपरा जीवंत ठेवली असल्याचे सांगत फडणवीस यांनी आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ यांचे विशेष कौतुक केले.
नेवाळीचा प्रश्न सामंजस्याने सोडवणारभूमिपुत्रांच्या समृद्धीनेच देशाची समृद्धी होणार आहे, हे माहीत असल्यानेच कोळीवाडयाचे सीमांकन करण्यास सुरुवात केली आहे. त्या जमिनी कोळी समाजालाच मिळाली पाहिजे, अशी आमची धारणा असून क्लस्टर आणि घरांच्या प्रश्नावर भूमिपुत्रांना विश्वासात घेतल्याशिवाय राहणार नाही. नेवाळीचा विषय सामंजस्याने सोडवू. यात समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल असेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. नेवाळी विषयात संरक्षण विभागाचे देखील म्हणणं ऐकून घेतले जाईल याबाबत केंद्रातही बैठका झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.