कल्याण : मुंबईसह उपनगरे व कोकण किनाऱ्यावरील कोळी, भोई मच्छीमारांच्या राहत्या जागेचा सीमांकनाचा प्रश्न ५० वर्षे प्रलंबित होता. हा महत्त्वाकांक्षी प्रश्न सोडवल्याबद्दल कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी कल्याण येथील आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात आभार मानले.मागील ५० वर्षांत कुठल्याही सरकारने मुंबईतील कोळी बांधवांच्या घरांच्या सीमांकनाचा प्रश्न सोडवलेला नव्हता. पण फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावला. तसेच कोळी बांधवांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.मुंबई परिसरातील प्रत्येक कोळी बांधवांच्या राहत्या जागेचे सर्वेक्षण करून सातबारा उत्ताºयावर त्यांचे नाव लावण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व अन्य जिल्ह्यांतील कोळी बांधवांना जातीचा दाखला व जात पडताळणी प्रक्रियेचा प्रश्न सर्वात जास्त प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यामुळे कोळी बांधवांना जातीचे दाखले व त्याची जात पडताळणी करणे सुलभ होणार आहे, असे पाटील म्हणाले.राज्यात प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे मत्स्यद्योगमंत्री महादेव जानकर यांनी मुंबई परिसरातील ४२ कोळी व भोई वाड्यातील मच्छीमारांना मासळी साठवण्यासाठी फायबरच्या १० हजार आइस बॉक्सचे वाटप केले आहे. त्याबद्दलही पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कोळी महासंघाने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:53 AM