ठाणे : कोळी नाही कोणाच्या धमकीस भिणारा या गाण्याला सार्थ ठरवताना अवकाळी पावसाला न जुमानता पारंपारिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठया उत्साहात पार पडला. त्यात पावसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.रविवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सकाळी आयोजक चिंतेत पडले होते. पण त्याही परिस्थितीत कोळी महोत्सव यशस्वी करायचाच यादृष्टीने तयारी सुरु ठेवली. दुपारी विश्रांती घेतल्यावर पावसाने मिरवणूकीदरम्यान हजेरी लावल्यावर आयोजक कात्रीत सापडले. पण पाऊस कमी झाल्यावर आई एकविरेला गाण्यात साकडे घालत कार्यक्रमाला सुरुवात केली अन पावसाला न जुमानता कार्यक्रम पूर्णत्वास नेला. पावसातही कोळी गाण्यांवर उपस्थित प्रेक्षकांनी धरलेला ताल, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची उसळलेली गर्दी पाहिल्यावर आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला.चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरु झालेली शोभयात्रा भर पावसात चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर हरेश्वर-भारती मोरेकर, तुकाराम-प्रमिला कोळी, विलास-दुर्गा कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावत पावसाला न जुमानता कार्यक्रम केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. कोळी समाज मुळातच धाडसी असल्याने अस्मानी संकटाला मात देत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजक विक्रांत कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिंदे यांनी अभिनंदन केले. माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक भरत चव्हाण,नम्रता कोळी, काँग्रेसचे सचिन शिंदे, आणि इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली.
ऐन पावसात यदांचा रंगला कोळी महोत्सव, एकनाथ शिंदे यांनी लावली उपस्थिती
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 27, 2023 3:48 PM