ठाणे : ठाण्यातील वादग्रस्त क्लस्टरमधून गावठाणे आणि कोळीवाडे वगळण्याची तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश शुक्रवारी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नसून जुन्या ठाण्यातील मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींना दोन एफएसआय देण्यासंदर्भात त्यांनी ठाणे पालिका आयुक्तांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिल्याने ठाण्यात नव्या वादाला तोंड फुटले असून येत्या काळात त्यास नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या मेळाव्यात भाजपाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन क्लस्टरमधून गाव, गावठाणे आणि कोळीवाडे वगळण्याची मागणी केली होती. ते पत्र स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी त्यावर लगेचच आपल्या स्वाक्षरीसह ‘आयुक्त, ठाणे म.न.पा. तत्काळ कार्यवाही करावी’ असा शेरा मारला आहे.भाजपाने हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात नेऊन त्यावर तत्काळ तोडगा काढून शिवसेनेवर मात केल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
‘कोळीवाडे, गावठाणांना क्लस्टरमधून वगळा’ - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 11:44 PM