- जितेंद्र कालेकर, ठाणेठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ठाणे स्टेशन ते कोलशेत या ९५ क्रमांकाच्या मार्गावर धावणारी बस पुन्हा कापूरबावडी मार्गावरूनही धावणार असल्याने ज्या पाच बस थांब्यांवरील बहुसंख्य प्रवाशांची गैरसोय झाली होती, त्यांना दिलासा लाभला आहे. प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच परिवहन प्रशासनाने सर्वेक्षण करून आता कापूरबावडी आणि टेकसन या दोन्ही मार्गांवर ही बस सुरू केली आहे. ‘टीएमटीच्या प्रवाशांना फटका : कोलशेत बसचा मार्ग बदलला : अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याने घेतले फैलावर’ या मथळ्याखाली ७ डिसेंबरच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रवाशांच्या मागणीनुसार आता टेकसनमार्गे ठाणे स्टेशन ते कोलशेत आणि कापूरबावडीमार्गे ही ठाणे स्टेशन ते कोलशेत अशा दोन्ही मार्गांवर सुरू ठेवण्याचे आदेश परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिले आहेत.प्रशासनाच्या सर्व्हेनुसार टेकसनमार्गे ठाणे स्टेशन ते कोलशेत जाणाऱ्या बसच्या एका फेरीतून चार हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळते तर कापूरबावडी हायलॅण्डमार्गे कोलशेतकडे जाणाऱ्या याच बसच्या एका फेरीतून एक हजारांचे जादा म्हणजे पाच हजार ४०० इतके उत्पन्न मिळते. उत्पन्नात साधारण २० ते २५ टक्के इतकाच फरक असल्याने टीएमटी प्रशासनाने टेकसनमार्गे तीन तर हायलॅण्ड कापूरबावडीमार्गे तीन अशा फेऱ्या सुरू केल्या आहेत. कापूरबावडीमार्गे जादा उत्पन्न आणि प्रवासीही जादा असल्याने या मार्गावर कालांतराने फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कापूरबावडीमार्गे जाणारी क्र. ९५ ही बस पाच थांबे वगळून टेकसन कंपनीमार्गे ढोकाळी-कोलशेत अशी सुरू केली. कोलशेतला जाणाऱ्या काही प्रवाशांनी वेळ वाचविण्यासाठी ही बस शॉर्टकट मारून अन्य मार्गाने घेण्याची मागणी केली.
कोलशेतची बस अखेर सुरू
By admin | Published: December 29, 2015 12:56 AM