भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत महापौर निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या भाजपचे सभागृह नेतेपद महापौरांनी काढून घेतल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. सभागृह नेते शाम अग्रवाल यांच्याविरोधात नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्यांची उचलबांगडी केली आहे. महापौर निवडणुकीच्यावेळी भाजपच्या २० नगरसेवकांनी कोणार्कला पाठिंबा दिला होता. दरम्यान, महापौरपदी विराजमान होताच कोणार्कने भाजपचे विरोधी पक्षनेते पद काढून घेतले तर शुक्रवारच्या महासभेत कोणार्क विकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
यासंदर्भात भाजपचे आमदार, खासदार व पक्षश्रेष्ठी कुठली भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. महासभेत अवघ्या काही वेळातच विषयपत्रिकेवरील विषय मंजूर केले. त्यात पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, पाच वर्षांपूर्वी लागू केलेला सहावा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना आजही लागू केला नसल्याने महासभेत सातवा वेतन आयोग मंजूर करूनही कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार की नाही, हे गुलदस्त्यातच राहणार असल्याची शक्यता कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. तर शहरात नवीन नाट्यगृह वऱ्हाळा तलाव परिसरात बांधण्याच्या विषयालाही महासभेत मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्यासाठीचा निधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे समजते. या विषयांबरोबरच शहरातील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे ,अग्निशमन यंत्रणा सक्षम करणे, नवीन रस्ते तसेच शहर विकासासाठी आवश्यक असलेल्या विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली आहे.