- रोहिदास पाटील, अनगाव
भिवंडीत खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पक्षकार्यालयात बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. भिवंडी महापालिकेच्या राजकारणात किगंमेकरची भूमिका बजावणारी कोर्णाक विकास आघाडी कुणाशीही आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढविणार आहेत. २२ जागा लढविणार असून उमेदवार निश्चित झाले आहेत अशी माहिती कोर्णाक विकास आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, आघाडीने श्रमजीवी संघटनेसोबत युती केली आहे.मागील निवडणुकीत त्यांनी सहा जागा लढवून त्या जिंकल्या होत्या. यंदा आघाडी २२ जागांवर निवडणूक लढविणार आहे. विकास आघाडीने केलेल्या विकास कामांच्या जोरावर ताकद वाढल्याने २२ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. अन्य पक्षातील इच्छुकांनीही उमेदवारी मागितली आहे. यावेळी श्रमजीवी संघटनेबरोबर युती केली आहे. त्याचा फायदा विकास आघाडीच्या उमेदवारांना होईल असा दावा केला आहे. निवडणुकीची रणनिती ठरविण्यात आली आहे. प्रभागातील प्रत्येक कुटुबांशी संवाद साधण्याबरोबरच सोसायटी आणि चाळीतील नागरिकांशी चर्चा करूनच उमेदवार निश्चित केले आहेत. दोन दिवसात उमेदवार निश्चित करु न अर्ज भरण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. माजी महापौर विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील हेही रिंगणात उतरले आहेत.श्रमजीवी संघटना कोर्णाक आघाडीसोबत निवडणूक लढविणार आहे. गरीबांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत. संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी आखलेल्या रणनितीनुसार कार्यकर्ते काम करणार आहेत. - दत्तात्रेय कोलेकर, जिल्हाध्यक्ष, श्रमजीवी संघटना.