ठाणे : घोडबंदरची वाहतूककोंडी दिवसेंदिवस सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी कासारवडवली पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन सतर्कता व्हॅन उभ्या केल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर एखादी दुर्घटना घडली, तर या मदतीस धावतील, अशी काहीशी ही उपाययोजना आहे.
घोडबंदर भागात मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा आकार कमी झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूंकडील सेवारस्त्यांवर महापालिकेचीही कामे सुरू आहेत. ती लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपाययोजना सुचवल्या आहेत. परंतु, ही कामे पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. एकाच वेळेस ही कामे सुरू असल्याने सेवारस्त्यांबरोबरच मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडीची समस्या वाढत आहे. वाघबीळ ते पातलीपाडा हे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी साधारणपणे दीड तासाचा अवधी जात आहे. त्यामुळे एखादी घटना घडली किंवा वाहतूक सुरळीत करायची झाली, तर येथील पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. मागील आठवड्यात कासारवडवलीच्या पुढील भागात हत्येची एक घटना घडली होती. परंतु, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल दीड तासाचा अवधी लागला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना किंवा इतर घटना घडल्या, तर वाहतूककोंडीची ही समस्या लक्षात घेऊन फारच वेळ जाण्याची शक्यता पोलिसांनी लक्षात घेतली आहे. त्यानुसार, यावर उपाय म्हणून रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एकेक अशा दोन पोलीस व्हॅन उभ्या केल्या आहेत. यामुळे वेळ वाचत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.युक्तीची जोरदार चर्चाच्पोलिसांनी लढवलेल्या या नामी युक्तीमुळे घटनास्थळीसुद्धा वेळेस जाण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु, या नामी शकलीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.च्याशिवाय, वाहतूककोंडी कुठून कुठपर्यंत झाली आहे, याची माहिती घेण्यासाठी गुगल मॅपचा सहारा घेतला जात आहे. त्यामुळे नेमकी कोंडी किती आहे, त्यानुसारही उपाययोजनाही केल्या जात आहेत.