नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी:भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात वाहन चोरीच्या घटना अधिक होत असताना पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे व सहाय्यक पोलीस आयुक्त शेळके यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रगस्त व नाकेबंदी करण्याचे आदेश दिले असता कोनगाव पोलिसांनी गस्ती दरम्यान एका आंतरराज्यीय इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास रविवारी अटक केली आहे.
त्याच्या ताब्यातून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे.ऑनअली सरफराज जाफरी वय २२ रा.पिराणीपाडा शांतीनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. मोटार सायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या नंतर कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शना सपोनि किरणकुमार वाघ,सपोनि अभिजीत पाटील,पोहवा पंडीत जाधव, मधुकर घोडसरे, श्याम कोळी, पोना नरेंद्र पाटील, गणेश चोरगे, नामदेव वाघ, रमाकांत साळुंखे यांनी कोनगाव परिसरात गस्त घालीत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास वासुदेव पाटीलनगर येथे ऑनअली सर्फराज जाफरी हा संशयीत रित्या मोटार सायकलसह मिळून आला.
त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या तपासात कोनगांव पोलीस ठाण्यातील चोरीस गेलेल्या ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले.विशेष म्हणजे ऑनअली सर्फराज जाफरी हा आंतरराज्यीय इराणी टोळीतील गुन्हेगार असून त्याविरोधात या पूर्वी भिवंडी शांतीनगर ,कल्याण महात्मा फुले,कर्नाटक बिदर येथील गांधीगंज या तीन पोलीस ठाण्यात त्या विरोधात पाच गुन्ह्यांची नोंद आहे .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"