ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथक ठाणे आणि मुंबईच्या पथकांनी संयुक्तरित्या मुंबईच्या खार जिमखाना भागात रविवारी दिवसभर धाडसत्र राबवून सुमारे दोन कोटींचे बनावट विदेशी मद्य जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खार जिमखाना येथे एक व्यक्ती बनावट स्कॉच मद्य विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लाड, दुय्यम निरीक्षक रविंद्र पाटणे तसेच मुंबई भरारी पथक १ चे निरीक्षक मनोज चौधरी यांच्या पथकाने रविवारी रात्री ही कारवाई केली. मिळालेल्या बातमीच्या आधारे खार जिमखाना १७ वा रस्ता येथे आलेल्या पुंजालाल पटेल (रा. अंधेरी, मुंबई) याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेले विदेश मद्य मिळाले. त्याने हे बिपीन शहा यांच्याकडून आणल्याचे सांगितले. या पथकांनी त्यांच्याकडून आणखी मद्याची मागणी केली. शहाने अंधेरीच्या एसव्ही रोड येथील विजय सेल्स याठिकाणी येण्यास शहाने येण्यास सांगितले. बिपीन शहा याने दुचाकीवरुन आणखी मद्याच्या बाटल्या त्याने आणल्यानंतर या पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशीतून अधेरीतील अॅमरॉन्ड अपार्टमेंट मधील गाळा क्रमांक २३ मधून विदेशी स्कॉचचे १७५ बॉक्स हस्तगत करण्यात आले. भाडयाने घेतलेल्या या गाळयात अगरबत्ती विक्रीसह विदेशी मद्याचीही बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे शहाने चौकशीत सांगितले. दिल्लीतील अशोक नावाच्या व्यक्तिकडून हे मद्य आणल्याचेही त्याने सांगितले. या छाप्यात आयात शुल्क न भरलेल्या विदेशी स्कॉचच्या वेगवेगळया कंपन्यांचे १८०० बाटल्याचे १७५ बॉक्सचा सुमारे दोन कोटींचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी आणि संचालक सुनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.