सुरेश लोखंडे, ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या पिकांकरीता पीक विमा काढता येत आहे. त्यासाठी अंतिम दिनांक १५ जुलै आहे, असे कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगाम करीता पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिदाचा पीक विमा उतरविता येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही माने यांनी स्पष्ट केले. ठराविक पिकांकरिता अधिसूचित असणाऱ्या महसूल मंडळामधील शेतकरी त्या पिकाचा विमा उतरवू शकतील. ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस.जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.
या याेजनेमध्ये ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामी अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तींचा अधिन राहून निश्चित केली जाईल. या पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ (सातबारा) उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँक खात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, सहकारी पतसंस्था, पीक विमा अँप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीक विमा अर्ज दाखल करता येईल.