ठाणे : शिवसेना, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, ठाणे यांच्यातर्फे सोमवारपासून ‘कोकण महोत्सव २०१६’ होत आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच दशावतारी नाटकांचा प्रसार व प्रचार करण्याचे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ठाणे पालिका शाळा क्र. १२० चे पटांगण, सावरकर नगर, ठाणे (प), येथे रविवार १३ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव होईल. यावेळी डबलबारी भजनांचा कार्यक्रमही होणार आहे. या महोत्सवात कोकणी खाद्यपदार्थ स्टॉल्स, मसाले, लोणची, पापड यांचे स्टॉल्स असतील. सोमवारी सायं ६ वा. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे ‘इच्छाधारी नागीण’ हे नाटक, मंगळवारी सायं. ६ वा. देवी माऊली दशावतार नाट्य मंडळाचे ‘युगपुरुष’, बुधवारी सायं ६ वा. खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘उषास्वप्न बाणासुर’, गुरुवारी सायं ६ वा. पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ होईल. सायं. ७ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ‘कमाल माझ्या बाबाची’चा प्रयोग करणार आहेत. शुक्र वारी सायं ६ वा. शरद मोचेमांडकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘भाऊबीज’, शनिवारी सायं. ६ वा. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे ‘दीप तुझ्या वंशाचा’, रविवारी सायं. ६ वाजता शिव व्याखाते नितीन बानगुडे पाटील यांचे ‘शिवचरित्र व्याख्यान’ होणार आहे. महिलांसाठी खेळ पैठण्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असून, बच्चे कंपनीसाठी फन एन फेअरचे आयोजनदेखील करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात आजपासून ‘कोकण महोत्सव’
By admin | Published: November 07, 2016 2:49 AM