कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक; शिंदे-अजित पवार गट भाजपला नाचवणार
By अजित मांडके | Published: October 13, 2023 07:03 AM2023-10-13T07:03:48+5:302023-10-13T07:04:38+5:30
लोकसभा मागाल, तर पदवीधर लढण्याचा शिंदे गटाचा इशारा...
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड असताना शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने निवडणूक रिंगणात उडी मारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपबरोबरच सत्तेतील मित्रपक्षांनी मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. शिवसेनेच्या बैठकीत कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली. ठाण्यात भाजप-शिवसेनेत सख्य नाही पण शिंदे व अजित पवार गटात मधूर संबंध असल्याने भाजपला नाचविण्याची संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडणार नाहीत.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप काही कालावधी असला, तरी आतापासून ठाण्यात निवडणुकीची रंगत वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने ठाण्यात बैठक घेतली. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेने मतदार नोंदणीबाबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपकडून जी वागणूक मिळत आहे, ती पाहता कोकण पदवीधर निवडणूक आपण लढवावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे.
मागील निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी मतदार नोंदणीला सुरूवात केली आहे. अजित पवार गटात असलेले मुल्ला निवडणूक लढणार किंवा नाही, याबाबत तूर्त स्पष्टता नसली तरी त्यांनी नव्याने केलेली मतदार नोंदणी ही शिवसेनेच्या फायद्याची ठरणार आहे. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत फारसे सख्य नाही. मागील निवडणुकीत मुल्ला यांना १४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे भविष्यात भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीला निवडणूक लढविण्यापासून परावृत्त केले तरी निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या नाकदुऱ्या भाजपला काढाव्या लागतील.
शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित?
मागील निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादीचा शरद पवार गट मैदानात उतरला आहे. त्यांच्याकडून मतदार नोंदणीसाठी सर्व तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचा संभाव्य उमेदवार निश्चित झाला आहे. त्यामुळे वरकरणी एकतर्फी वाटणारी कोकण पदवीधर निवडणूक चुरशीची होण्याची चर्चा आहे.
शिवसेनेचा गड सोडण्यास नकार
भाजपकडून ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा केला जात आहे. पण शिवसेना हा गड सोडण्यास तयार नाही. परंतु, भाजप आपला दावा भक्कम असल्याचे सांगत आहे. भाजप लोकसभा मतदारसंघ मागत असेल तर आम्ही कोकण पदवीधर का मागू नये? असा सवाल शिवसेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.