ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघात मागील १२ वर्षात केवळ गटार पायवाटा यांचीच कामे झाली असून पदवीधरांची एकही कामे झाली नसल्याचा आरोप मनसेचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी केला. तर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवडणूक लढवत असून आम्ही स्वतंत्र लढत असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिला आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पानसे यांनी भाजपवर हल्ला बोल केला. आमचा जाहीरनामा किंवा वचननाम नसेल तर आमचा या मतदार संघासाठी रोजगारनामा असेल असेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपचा पाठींबा घेणार का असा सवाल केला असता आमचा पक्ष आदेशावर चालतो, मी मनसेकडून लढत आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले. आमची त्यांचेकडे चर्चा झाली नाही किंवा त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर चर्चा झालेली नसल्याची माहिती यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
दरम्यान, प्रत्येक पक्ष वेगवेगळा असतो, आम्ही महायुतीत जरी असलो तरी हा पक्षाचा विषय आहे, आम्ही उमेदवारी जाहीर केली असेल तर काही तरी विचार करुन जाहीर केली असेल. महायुती चा उमेदवार असला तरी निरंजन डावखरे यांचा मला फोन आला होता त्यांच्याशी मी फोनवर बोलणार आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली नाही. येणाऱ्या निवडणूकांच्या जागेवर आता बोलणं उचित नाही, ४ जून नंतर काय निकालाची परिस्थिती आहे राज्याची परिस्थिती आहे यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत. विधानसभेची तयारी आम्ही आधीपासूनच सुरू केली आहे, आमची लोक कार्यकर्ते कामाला लागलेली आहेत, निकालानंतर बसून जो काय निर्णय आहे तो घेण्यात येईल असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.