ठाणे : ४० व्या वर्धापन दिना निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सहयोग मंदिर,ठाणे (प) येथे अनघोत्सव आयोजित करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमश्री वामन केंद्रे असून विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भारतकुमार राऊत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रकाशक अमोल नाले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ विलास खोले आणि प्रा.अनंत देशमुख प्रमुख व्यक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांची तीन तर डॉ महेश केळुसकर यांची चार पुस्तके प्रकाशित होणार आहेत. यानिमित्ताने मधु मंगेश कर्णिक यांच्या समग्र साहित्याचे संक्षिप्त रूपच महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहेच तर डॉ महेश केळुसकर यांच्या दशावतार, लळीत, चित्रकथी या पुस्तकांमुळे कोकणातल्या लोककलेचा आस्वाद तमाम मराठी माणसाला मिळेल यात शंका नाही तर माझा आवाज या केळुस्करांच्या पुस्तकाने नवोदित वृत्तनिवेदक, शिक्षक आणि प्राध्यापकांना एक उत्तम असे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच अनघा प्रकाशनाच्या पुसकांच्या परिक्षणाबरोबरच अनघाच्या लेखकांचा परिचय लोकांना व्हावा या उद्देशाने 'अनघावार्ता' या अनियतकालिकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अनघा प्रकाशनाला यावर्षी ४० वर्षे होत आहेत. कै माधव गडकरी, कै अरुण साधू, कै. अशोक जैन, कै पं यशवंत देव, कै.वसंत भालेकर, कै.इसाक मुजावर,कै. गो.आ. भट, कै. परेन जांभळे, कै.रमेश उदारे यांसारख्या नामवंत लेखकांची तर पुस्तके अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलीच पण पदमश्री मधु मंगेश कर्णिक, सुलोचनादीदी, डॉ महेश केळुसकर, डॉ भारतकुमार राऊत, डॉ विलास खोले, डॉ मोहिनी वर्दे, माधवी घारपुरे, जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, चंद्रकांत भोंजाळ, डॉ.प्रदीप कर्णिक, डॉ.विजय पांढरीपांडे, डॉ.नीता पांढरीपांडे, डॉ.सिसिलिया आणि अनेक जुने नविन लेखक आजही हक्काने अनघा कडे लिहीत आहेत.आणि म्हणूनच असं वाटत की अनघाच्या आणि तिच्या संलग्न संस्था म्हणजेच मोनिका प्रकाशन(नाशिक),वेदांत पब्लिशिंग हाऊस(पुणे) आणि अमोल वितरण यांच्या माध्यमातून ही साहित्यरूपी पालखी साहित्याची सेवा करत आहे. अनेक अडचणी आणि अडथळ्यांना पार करत आजवरचा ४0 वर्षाचा प्रवास रात्री झोपतांना शांत झोप देऊन जातो, कारण सर्व नामांकित लेखकांच्या प्रेमाने आणि त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासावरच हे शक्य झाले आणि म्हणूनच मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाने आम्ही उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद स्थापन करू शकलो आणि त्या माध्यमातून तीन साहित्य संमेलने घेऊ शकलो अशी माहिती अमोल नाले यांनी दिली.