ठाणे - कविता भावनांचा अविष्कार असतो . निकड असल्याशिवाय कागदावर उतरवू नये . तरच कविता आतून येते , अस्सल येते . शब्दांना अर्थ नसेल तर काव्य नसेल तर पोकळ असते . शब्दाला वजन असते , शब्द पाळण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत असते . त्यामुळे कवींनी आपल्यता शब्दाला वजन आहे का हे पाहणे गरजेचे आहे . कोकणी माणसाने हातात काम घेतले कि मागे हटत नाही . त्याप्रमाणे ८५ तास सलग चालणार्या कवी संमेलनाचे आयोजन कौतुकास्पद आहे अशा भावना कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केल्या.
अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात राज्यातील १००० पेक्षा जास्त कवी सहभागी होणार आहे. या कविसंमेलनाचे उदघाटन डॉ . केळुस्कर यांच्या काव्यवाचनाने झाले . कवी जेव्हा माझया मनातलं बोलत आहे असे वाटते तेव्हा आपण त्या कवितेशी समरस होतो . कविता न लिहणारे कवी असतात , परंतु कवी हे बोलके रसिक असतात असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी पुढे म्हणाले कि, कवी संमेलनासारखे उपक्रम साहित्य विश्वात चैतन्य निर्माण करतात. त्यामुळे असे उपक्रम आयोजित करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी ' झिनझिनाट ' ही मालवणी बोलीभाषेतील कविता सादर केली . ज्येष्ठ साहित्यिका डॉ . विजया वाड '' सु सु सुट्टी , शाळेला बुट्टी '' ही कविता सादर करत ८५ तास काव्य संमेलनासाठी शुभेच्छा आयोजकांना दिल्या . ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांनी सादर केलेलया ' मिठी ' या कवितेला रसिकांची विशेष दाद मिळाली . या प्रसंगी डॉ . ज्योती परब यांच्या ' शब्दसुमने ' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ . विजया वाड आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रा . दिनेश गुप्ता , ख . र . माळवे , डॉ , ज्योती परब , अखिल भारतीय कला , क्रीडा , सांस्कृतिक अकादमी प्रमुख साक्षी परब , वृषाली शिंदे, आरती कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थितीत होते. या संमेलनाचा समारोप 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे कवी अशोक नायगावकर व अँड राजेंद्र पै उपस्थितीत राहणार आहेत. माजी खासदार व पत्रकार भारतकुमार राऊत अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत . या संमेलनात दोन तासांचे कवितांचे सत्र आयोजित करण्यात आली आहेत. लहान मुले, विद्यार्थी, अंध, दिव्यांग, पोलीस, स्त्रिया अशा विविध घटकांसाठी स्वतंत्र सत्र होणार आहे.या संमेलनात कवी गोविंदाग्रज, विष्णू सूर्या वाघ आणि ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार्या काव्यमंचावर कवितांचे वाचन होणार आहे. कवी केशवसूत कट्ट्यांतर्गत विविध कवितां संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जुन्या - नव्या कवींच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या संमेलनात भरवण्यात आले आहे .