डोंबिवली -: डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि येथील नागरिकांना रहदारीकरिता अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रेल्वेवरील नवीन कोपर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. याप्रसंगी मनपा महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेवक विश्वनाथ राणे उपस्थित होते.
या उड्डाणपुलाच्या परिसरातून जात असलेल्या विद्युतवाहिन्यांचे पुश-थ्रूच्या माध्यमातून भूमिगत करण्याचे काम सुरू असून महिन्याभरात हे काम पूर्ण होईल. तसेच या उड्डाणपुलाच्या दोन पिलर उभारण्याचे काम सुरू असून या पुलाच्या गर्डरचे काम अहमदाबाद येथील कारखान्यात वेगाने सुरू आहे. पुलाची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन हा पूल नोव्हेंबर २०२० अखेर पर्यंत वाहतुकीकरिता खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या कल्याण दिशेकडील रेल्वेवरील पादचारी पुलाची देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी पाहणी करत आढावा घेतला. डोंबिवली रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मना जोडत पूर्व–पश्चिमेला ये-जा करण्यासाठी नागरिकांसाठी महत्वाचा असलेल्या या पादचारी पुलाचे काम कोरोना संकटकाळात देशभरात तसेच राज्यभरात लॉकडाऊन जाहीर केला असताना शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत सुरू केले होते. आता पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून ३० ऑगस्टपर्यंत हा पूल नागरिकांकरिता खुला करण्यात येणार आहे.