कल्याण : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन कल्याण-डोंबिवली मनपा प्रशासनाने दिली होती. मात्र, या पुलासाठी आवश्यक असलेल्या २१ गर्डरपैकी चारच गर्डर तयार करण्यात आले आहेत. तसेच हे गर्डर अद्याप डोंबिवलीत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे कोपर पुलाची डेडलाइन लांबणार आहे.
डोंबिवलीतील कोपर रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्याने तो दीड वर्षांपूर्वी वाहतुकीस बंद करण्यात आला. या पुलाचे सरकार दरबारी दस्तऐवज सापडत नव्हते. तसेच पुलाचा खर्च कोणी करायचा यावरून रेल्वे व महापालिका यांच्यात एकमत होत नव्हते. त्यामुळे पुलाच्या कामाला व निविदा प्रक्रियेस उशीर झाला. पुलाच्या कामासाठी ११ कोटींची निविदा काढण्यात आली. मात्र, मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे कामगार मिळत नव्हते. अशा परिस्थितीत प्रशासनाने पुलाचे पाडकाम १५ दिवसांत एप्रिलमध्ये पार पाडले. पुलावरील सेवा वाहिन्या दूर करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, या सेवा वाहिन्यांमुळे पुलाच्या कामाला विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
‘गर्डरचे काम सुरू’यासंदर्भात प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा म्हणाले, कोपर पुलासाठी एकूण २१ गर्डरची आवश्यकता आहे. गर्डर तयार करण्याचे काम औरंगाबाद येथील एका कंपनीत सुरू आहे. सध्या चारच गर्डर तयार झाले आहेत. तसेच ते तेथून अद्याप डोंबिवलीत आलेले नाहीत. गर्डर आल्यावर ते टाकण्याचे काम केले जाईल. त्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कामाची डेडलाइन लांबणार ही वस्तुस्थिती आहे.