लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई-अहमदाबाद पूर्व द्रुतगती राष्ट्रीय महामार्गावरील कोपरी रेल्वेपूल हा अरुंद असल्याने या ठिकाणी मुंबईकडे ये-जा करताना तसेच नाशिक-अहमदाबादला जाणाऱ्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोपरी रेल्वेपुलाच्या गर्डरचे काम तत्काळ पूर्ण करून तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश खा. राजन विचारे यांनी ठाण्यातील अधिकारी यांना बुधवारी दिले.
ठाणे-मुंबई मार्गावर कोपरी रेल्वेपुलाच्या कामामुळे नेहमीच वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर या रेल्वेपुलाच्या कामाची पाहणी विचारे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के तसेच शासकीय अधिकारी यांंच्यासमवेत बुधवारी केली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता डी. डी. लोलगे, एमएमआरडीएचे अभियंता सुर्वे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
फेज-१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा२४ एप्रिल २०१८ रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाचे बांधकाम मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे बंद पडलेले काम सुरू करण्यासही त्यांनी मंजुरी मिळवली होती. बुधवारी हा पाहणी दौरा झाला. त्यावेळी विचारे यांनी ६५ मीटर लांबीच्या १४ गर्डरपैकी फेज-१ च्या सात गर्डरचे काम डिसेंबरअखेरपर्यंत टाकण्याच्या सूचना रेल्वे अधिकारी यांना दिल्या.