ठाणे- गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी, ठाणे पूर्व भागातील कोपरी प्रभाग समितीच्या इमारतीमध्ये, आरोग्य विभागातील कर्मचारी कक्षाचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर आता सोमवारी याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील, बाहेरच्या बाजूस एलीव्हेशन पिंथ कोसळल्याची घटना घडली आहे. या घातेन सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. तसेच धोकादायक भाग पाडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना, त्यांच्या प्रभागातच विविध दाखले आणि समस्यांचे निरसन व्हावे, यासाठी प्रभाग समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या कोपरी उपप्रभाग समितीच्या कार्यालयाची इमारत धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे. त्यात या इमारतीच्या बाहेरील भागाचा सज्जा येथील अधिकाऱ्यांच्या वाहनावर पडल्याची घटना देखील घडली होती. त्यानंतर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आरोग्य केंद्रातील स्टाफ रुममध्ये सीलींग प्लास्टर पडल्याची घटना घडली. या घटनेने येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात या कक्षातील डागडुजीचे काम केल्यानंतर हा कक्षा पुन्हा सुरु करण्यात आला होता.
दरम्यान, सोमवारी दुपारी १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास कोपरी प्रभाग समितीच्या बाहेरील बाजूचे एलीव्हेशन पिंथ कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैमाने जीवितहानी झाली नसली तरी, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या शेडवर पिंथ पडल्याने त्याचे नुकसान झाले असून एक दुचाकी व चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. तसेच धोकादायक भाग पडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते.