लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडला जाणाऱ्या कोपर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाचा भाग असलेल्या राजाजी पथ येथील अंडरपासवरील उड्डाणपुलाचा स्लॅब जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात भरण्यात येईल. त्यानंतर २८ दिवसांनंतर तांत्रिक मापदंडानुसार पूल वाहतुकीसाठी सुरू करता येईल. त्या दरम्यान विद्युतीकरण व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातील इतर कामे केले जातील, असे केडीएमसीने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. दरम्यान, वरील सर्व बाबींचा विचार करता हा पूल ऑगस्टअखेर सुरू होणे अपेक्षित असल्याची माहिती मनपाच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली आहे.
कोपर पुलाच्या सद्य:स्थितीबाबत कोळी म्हणाल्या, पावसाळ्यात स्लॅब भरताना अधिक सुरक्षा व खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले आहे. परंतु, पावसामुळे पोहोच रस्त्यावरील भरावावर डांबरीकरण करणे योग्य नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुलाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, लोखंड, ऑक्सिजन, गॅस तसेच मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे प्रकल्प अपेक्षित कालावधीत पूर्ण करण्यात बाधा आल्याचे मनपाने म्हटले आहे.
रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या पुलाच्या भागातील महावितरणच्या दोन उच्चदाब विद्युत वाहिन्या अजूनही मध्य रेल्वेने इतर ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नाहीत. केडीएमसीने ही बाब वेळोवेळी बैठकीत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु, त्यावर मध्य रेल्वेमार्फत कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
त्रयस्थ तांत्रिक लेखा परीक्षकांकडून तपासणी
कोपर पुलाच्या पोहोच रस्त्यामधील गर्डर उभारण्याचे काम ३ मे रोजी पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प महत्त्वाचा असल्यामुळे कामादरम्यान वेळोवेळी चाचणी करण्यात येत आहे. स्लॅब भरण्यापूर्वी गर्डरमध्ये बसविलेल्या ८,७५८ नट बोल्टची तपासणी मनपा अधिकारी व त्रयस्थ तांत्रिक लेखा परीक्षक यांनी केली आहे. तसेच पोहोच रस्त्यावरील स्लॅब बांधण्याचे काम पूर्ण झालेले असून, त्याची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
----------------