डोंबिवली - मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कोपर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडण्याच्या नादात रविवारी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका चिमुरड्याचा समावेश होता, ही घटना अत्यंत र्दुदैवी होती. त्यामुळे प्रवाशांनी रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रवाशांना चॉकलेट वाटून रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले.
उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने त्या उपक्रमाला पाठींबा दिला होता. मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना हात जोडून विनंती करत रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले. प्रवाशांनीही साथ देत रूळ ओलांडणे मजबूरी असून वेळेत लोकल पकडण्याच्या गडबडीत चुकून पादचारी पूलाकडे न जाता थेट रूळाचा शॉर्टकट वापरला जात असल्याचे सांगितले.
कोपर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवाहन करताना भाजपा कार्यकर्त्यांसह प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपली घरी कोणीतरी वाट बघत आहे. याची जाणीव लक्षात घ्यावी, आणि रूळ ओलांडू नका. काही मिनिटे वाचवण्यासाठी पादचारी पूलाचा वापर टाळावा. पादचारी पूलामुळे सुरक्षित, सुखद, संरक्षित प्रवासाची हमी मिळते. प्रवाशांनीही सह प्रवाशांना रूळ ओलांडताना थांबवा, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आळा बसेल. ‘सुरक्षा व्यवस्थेवरही प्रचंड ताण असतो, तो ताण कमी करण्यासाठी आपण सगळयांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही पेडणेकर म्हणाले.
भाजपाच्या उपक्रमामध्ये आरपीएफ डोंबिवलीचेही पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांनीही अपघात, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने १८२ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले. तातडीने जनजागृती व्हावी यासाठी पोलिसांनी १८२ क्रमांकाचे बोर्ड हातात धरले होते. काही प्रवाशांनी मात्र १८२ ही हेल्पलाइन सुविधा नावाला असल्याची टीका केली. काही वेळेस अडचण येऊ शकते, पण ही सुविधा चांगलीच असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, अमित कासार, माजी नगरसेवक नरेंद्र पेडणेकर आदींसह युवक, युवती आणि स्वत:हुन प्रवासी आवर्जून उपस्थित होते.
पेडणेकर यांच्या माध्यमातून स्थानकालगत असलेल्या जागेत होर्डिगद्वारेही जनजागृती केली गेली. त्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यात आला होता. सातत्याने या संदर्भात सुरक्षा अभियान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पेडणेकर यांनी सांगितले की, २०१२ पासून या स्थानकात एस्कलेटर सुविधा असावी यासाठी विभागीय व्यवस्थापकांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राला केराची टोपली दाखलवली गेली का? असा सवालही त्यांनी केला. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारावी, अपघात टाळावे यासाठीही पत्रव्यवहार केला होता. तसेच साप येऊ नयेत यासाठी गवत तातडीने काढावेत यासाठी डोंबिवली स्थानक प्रबंधकांना पत्र दिली आहेत, पण रेल्वे प्रशासन कानाडोळा करत असल्याने कोणतीही उपाययोजना कोपर स्थानकासंदर्भात झालेली नाही. या ठिकाणाहून हजारो प्रवासी नित्याने प्रवास करतात. भविष्यात या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे हे देखील प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. रेल्वे पोलिसांनी मात्र त्यांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देत, यापुढे ते देखिल वरिष्ठांना तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात तगादा लावणार असल्याचे स्पष्ट केले.