ठाणे : ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंद नगर येथील टोल नाक्यावर आंदोलन केले, स्थानिकांना टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी सोमवारी सकाळी नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल देखील करण्यात आला आहे. सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वतःकडे असताना देखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत असा संतप्त सवाल करत कोपरीकर नागरिक आनंदनगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी धडकले. आपल्या उदरनिर्वाहासाठी दिवसातून अनेकदा हा टोलनाका ओलांडावा लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढला नाही तर मोठे जन आंदोलन छेडू असा कडक इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलकांनी सरकारला दिला आहे.
ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात देखील कोपरी आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोल पासून 10 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असताना सुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्ती टोल वसूल केला जातो. कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ अशी घोषणा केली होती. कोपरीकरानी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना घोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी तोल न भरता मुंबई शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊन देखील कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न स्वप्नच राहिले.
गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशे व्यतिरिक्त काहीच पडले नाही. त्यामुळे जन आक्रोश वाढत गेला व संतप्त कोपरीकरांनी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर चेकनाक्यावर धडक दिली. "सरकारमध्ये नसताना टोल बंद करू अश्या घोषणा देणारे आता गप्प का" तसेच "टोल लूटमार बंद करा " अशा घोषणा देत कोपरीकर आक्रमक झाले होते. शासनाचा अधिसूचना धुडकावून लोकांची लूट करणाऱ्या या टोलवाल्यानी कोपरीकरांना लवकरच टोलमुक्ती द्यावी अन्यथा याहून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी यावेळी दिला.