डोंबिवली : कमकुवत झालेल्या कोपर उड्डाणपुलाबाबत रॅनकॉन कंपनीने दिलेला सविस्तर पाहणी अहवाल बुधवारी केडीएमसीने रेल्वे प्रशासनाला सादर केला आहे. पुलावरील वजन महापालिकेने कमी केले असून, आता रेल्वेनेही पुलाचे वजन कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्या तर तो पूल अजूनही तग धरू शकतो, असे या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती केडीएमसीचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोपर उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचा थर तीन ते चार इंचाने कमी केला आहे. तसेच दोन्ही बाजूंकडील पदपथ काढले आहेत. त्यामुळे १८० टन वजन कमी झाले असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे.त्यापूर्वी २० मे रोजी रेल्वे प्रशासनाने महापालिकेला पूल कमकुवत झाल्याबाबतचे पत्र दिले होते. त्यात पुलावरील वाहतूक तातडीने बंद करावी, असे त्यात सुचवले होते. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २९ मे रोजी रेल्वेसमवेत महापालिका अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत केडीएमसीने नागरिकांच्या भल्यासाठी या पुलाच्या डागडुजीचा खर्च करावा, असे सांगितले होते. त्यानंतर, महापालिके चे आयुक्त गोविंद बोडके यांनी खासगी तज्ज्ञांकडून पुलाची पाहणी करून नंतरच पुलाच्या डागडुजीचा निर्णय घेऊ, असे कळवले होते. रेल्वेनेही महापालिकेला तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती बुधवारपर्यंत होती. मात्र, अडीच महिने महापालिकेने कोणतीही हालचाल केली नसल्याची टीका रेल्वेने केली होती. अलीकडेच महापालिका, रेल्वे अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा झाला होता. त्यावेळी रेल्वेने अल्टिमेटम दिल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने रॅनकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीला पुलाची पाहणी करून अहवाल देण्याचे काम दिले होते. त्यानुसार, त्यांनी पाहणी करून बुधवारी महापालिकेला अहवाल सादर केला. तो रेल्वेला दिल्याचे सांगण्यात आले. आता रेल्वे प्रशासन त्यासंदर्भात आयआयटीशी चर्चा करणार असल्याचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार, आता रेल्वे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रेल्वेने पुलाखालील भागात प्लेट्स लावून त्यांच्या पद्धतीने डागडुजी यापूर्वीच केलेली आहे. तसेच पुलाची देखभाल करतच आल्याचे याआधी रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी २३ आॅगस्टला या पुलासंदर्भात मध्यस्थी करत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के. जैन यांच्यासमवेत चर्चा केली होती. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचेही पत्राद्वारे लक्ष वेधले होते. पूल आताच बंद झाल्यास डोंबिवलीतील नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल. त्याचबरोबर पुलावरून महावितरणच्या वाहिन्या गेल्या असून, त्याद्वारे ५० हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. पूल बंद झाला, वाहिन्या काढल्या तर त्यांचीही गैरसोय होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले होते. तसेच रेल्वे, आयआयटीच्या मार्गदर्शनानुसार अवजड वाहनांची वाहतूक काटेकोरपणे बंद केल्याचा दावा त्यांनी केला होता. पूल डिसेंबरपर्यंत सुरू ठेवावा, अशी चर्चा केली होती.वाहतूक विभाग सज्ज- सतेज जाधवच्कोपर उड्डाणपूल बंद झाला तर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी दिली. २.८ मीटरचा हाइट बॅरिअर उभारला आहे. त्यामुळे त्यापेक्षा उंच वाहने पुलावरून जाऊ शकत नाहीत.च्पूल बंद झाला तर एकदिशा मार्गाने वाहतूक वळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासाठी सम-विषम (पी १ पी २) पार्किंगची अंमलबजावणी केली जाणार आहे. महापालिकेकडे २५ वॉर्डन मागितले होते त्यापैकी १० वॉर्डन देण्यात आले आहेत. उर्वरित वॉर्डन लवकरच देण्याचे केडीएमसीने कळवल्याची माहिती जाधव यांनी दिली.