Kopri Pachpakhadi Assembly : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे. विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळून आल्याचे शिंदे गटाने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मात्र आता आरोप खोटे असल्याचा आरोप केदार दिघे यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत काहीही आढळलं नसल्याचे केदार दिघे यांनी म्हटलं आहे.
ठाण्याच्या अष्टविनायक चौकात केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदिप शेंडगे यांच्यासर इतर साथिदारांनी कारमध्ये विदेशी मद्य आणि २ हजार रुपयांची पाकिटे वाटण्यासाठी आले होते असा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. त्यानंतर केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता केदार दिघे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
"माझी गाडी चेक करतानाचा व्हिडिओ मी जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करत आहे. त्यात काही सापडले नाही. हा मला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून मी स्वतःहून पोलीस स्टेशनला माझी गाडी घेऊन गेलो होतो, त्यानंतर जे काही घडत आहे ते राजकीय हेतूने प्रेरित आहे," असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.
गाडीतून मद्य आणि पैसे वाटप करत असताना केदार दिघे स्वतः गाडीत उपस्थित होते आणि वाटप करत असताना त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. शिवसेनेच्या पदाधिकारी वर्षा भोसले यांच्या तक्रारीवरून केदार दिघे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.