ठाणे - एकीकडे खाजगी बसेसचा मुद्दा वारंवार परिवहन समितीच्या बैठकीत गाजत असतांना आणि या बसेसवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन परिवहन प्रशासनाने दिले आहे. परंतु परिवहन, आरटीओ आणि वाहतुक पोलिसांच्या नाकावर टिच्चुन खाजगी बसेसने पुन्हा कोपरीत आपले पाय पसरले असल्याचे दिसत आहे. पुन्हा कोपरी या बसेसने गजबजून गेले आहे. ठाणे पुर्व भागातील सिद्धार्थ नगर ते हसीज कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा खासगी बस गाड्यांची रेलचेल गेल्या अनेक वर्षांपासुन सुरु आहे. यामुळे या परिसरात सकाळ व संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला कोपरीकरांना सामोरे जावे लागत होते. या ठिकाणाहून ठाणे महापालिका परिवहन विभागाची बससेवा सुरळीत व पुरेशा प्रमाणात नसल्याने शहराच्या बाह्य भागातून ठाणे स्थानकापर्यंत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाºया खासगी बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बसेस सर्वाधिक घोडबंदर ते ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात हसीज कॉर्नर पर्यंत येत असतात. यामुळे सिध्दार्थ नगर ते हसिजा कॉर्नर परिसारात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे कोपरीकरांना ५ ते १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी २० मिनिटे वाहतुक कोंडीत घालवावी लागत होती. दरम्यान, एका ज्येष्ठ नागरिकाच्या अपघातानंतर कोपरीवासीयांनी एकत्र येऊन या बसेसच्या विरोधात एल्गार पुकारला होता. तसेच कोपरी बंदची हाक देखिल देण्यात आली होती. स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून अखेर पोलिसांनी या बस चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. घोडबंदर येथून येणाऱ्या खासगी बसेस व कंपनीच्या बसेस बारा बंगला येथे थांबविण्यात येत आहेत. त्यामुळे बारा बंगला येथे कारवाईला सुरु वात केली होती. यामुळे काही दिवस या परिसरातील खासगी बेकायदा प्रवासी वाहतुकीला काही अंशी ब्रेक लागल्याने कोपरीकरांची वाहतुक कोंडीतुन सुटका झाली होती.दरम्यान, परिवहनच्या बसथाब्यांवरुन खाजगी बसवाले प्रवासी उचलत असल्याचा मुद्दा देखील मागील काही परिवहनच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. दहा दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत प्रशासनाने अशा बसेसवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन परिवहन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर या बसेसवर आळा बसेल अशी आशा वाटत होती. परंतु आता पुन्हा या बसेसने कोपरीत आपले पाय मारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे परिवहन प्रशासन, आरटीओ आणि पोलीस एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघते आहे का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कोपरी पुन्हा खाजगी बसेसच्या वाहतुकीने गजबजले, कारवाईचा केवळ फार्सच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 3:48 PM
खाजगी बसेसवर कारवाईचा बार हा फुसकाच असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. कोपरीत बंद झालेल्या या बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन प्रशासन, आरटीओ आणि वाहतुक पोलीस एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
ठळक मुद्देखाजगी बसवर कारवाईचा केवळ फार्सगुन्हे दाखल करण्यात कुचराई