ठाणे : एकीकडे शहरातील लेडिज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लरवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे मात्र कोठारी कम्पाउंडमधील गाळेधारकांना तारीख पे तारीख दिली जात आहे. नोटिसा बजावण्यापलीकडे पालिकेने अद्याप येथील बांधकामांवर हातोडा टाकलेला नाही. आता पुन्हा एका आठवड्याची मुदत दिली आहे. त्यातच येत्या १३ आॅक्टोबरला पुन्हा महासभा लावण्यात आली आहे. परंतु, कारवाई झाली नाही तर ती होणार का, असा प्रश्न कायम राहणारच आहे.कोठारी कम्पाउंडच्या मुद्यावरून मागील महिन्यात महापौरांनी महासभा तहकूब केली होती. त्यानंतर, आता ३ आॅक्टोबर रोजी ती लावण्यात आली आहे. परंतु, या वेळेस महापौर आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शहरातील इतर ठिकाणी कारवाई करताना पालिकेने नोटीस बजावली नव्हती. हा मुद्दा महासभेतदेखील गाजला होता. त्यानंतरही पालिकेने कोठारी कम्पाउंडमधील गाळेधारकांना नोटीस बजावण्याचे काम केले आहे. दुसरीकडे तसेच यापूर्वी कारवाई होऊनही पुन्हा एकदा सुरू झालेल्या शहरातील अनधिकृत लेडिज बारवर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. या खेपेलादेखील पालिकेने संबंधितांना कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता थेट कारवाई केली. याचाच अर्थ एकाला एक न्याय आणि दुसºयाला एक न्याय, अशी भूमिका प्रशासन घेत असल्याचा आरोप होत आहे. आतापर्यंत शहरातील सहा बारवर कारवाई केली आहे. अनधिकृत लेडिज बारवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या कारवाईपूर्वी कोठारी कम्पाउंडमधील सुरू असलेल्या सर्वच अनधिकृत हुक्कापार्लर, पबवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कोठारी कम्पाउंडच्या निमित्ताने महासभेत उठलेले वादळ शांत करण्यासाठी सर्वसाधारण सभेनंतर पालिका आयुक्त आणि राजकीय पदाधिकाºयांची एक महत्त्वाची बैठक झाली होती. तीनंतर प्रथम २० सप्टेंबर रोजी २६ व्यावसायिकांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर, दुसºयांदा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा १०० हून अधिक व्यावसायिकांना बजावल्या.त्यानंतर, कोठारी कम्पाउंडमधील व्यावसायिकांनी महापालिकेच्या या कारवाईलाच आव्हान दिले होते. त्यानंतरही पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पुन्हा एकदा नव्याने नोटिसा दिल्या आहेत. उपायुक्त स्तरावरील तसेच फायर ब्रिगेडच्या या नोटिसा असून पुन्हा एकदा या व्यावसायिकांना त्यांच्या बचावासाठी संधी दिली आहे.
कोठारी कम्पाउंडला केवळ तारीख पे तारीख, पालिका बजावतेय केवळ नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:40 AM