डोंबिवली : ग्राहक व गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार झालेला प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपासाधिकारी सुनील वाघ याला याच प्रकरणात तक्रारदाराकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्यामुळे पवार यांनी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण जाधव यांच्याकडे दिला आहे.कोठारी याने ग्राहकांना जागा, सोन्यामध्ये तसेच गुंतवणुकीच्या पैशांवर अधिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याचे तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. त्याआधारे त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पवार म्हणाले, ‘कोठारी सापडलेला नाही. पण त्याची माहिती घेणे सुरू आहे. त्याचे बंद असलेले घर, दुकान तसेच नातेवाइक यांच्याकडेही तपास करण्यात येत आहे. दोन पथकांमधील पोलीस कर्मचारी त्या कामात गुंतले आहेत. त्याचे दुकान सील करण्यासंदर्भातही आदेश मिळाले आहेत. आवश्यक बाबींची पूर्तता करून कार्यवाही केले जाईल.’दरम्यान, वाघ याच्या अटकेमुळे तपासाधिकारीही बदलण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. कोठारीला अटक करून फसवणूक झालेल्यांना त्यांचा मुद्देमाल मिळवून देण्याचा दृष्टीने तपास सुरू असल्याचे पवार म्हणाले.
कोठारीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला- विजयसिंह पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 1:12 AM