टोकावडे : सरकारी यंत्रणा वारंवार दक्षता घेण्याचे आवाहन करत असूनही मुरबाड तालुक्यात लग्न, हळद समारंभ जोरात सुरू आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. तालुक्यात एकाही ठिकाणी या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी अथवा सरकारी रुग्णालय नसल्याने रुग्णांना शहरी भागातील रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
मुरबाड तालुक्यातील २० रुग्णांवर सध्या शहरी भागातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत मुरबाड नगरपंचायत हद्दीत ४०५, तर ग्रामीण भागात ८०१ असे एकूण १२०६ नागरिक कोरोनाबाधित झाले असून, ५९ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर ११२७ बाधित उपचारांती बरे झाले आहेत.
मुरबाड तालुक्यात बंद असलेले सरकारी कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाशेजारी सरकारी ट्रॉमा सेंटरमध्ये पूर्वी कोविड सेंटर सुरू होते. परंतु ते बंद करून तेथे आता कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी हलविल्यानंतर तेथे सरकारी कोविड सेंटर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीधर बनसोडे यांनी कोविड लस घेण्याचे आवाहन करत नियम पाळावेत अशा सूचना केल्या आहेत, मात्र सर्वसामान्य त्याचे पालन करताना दिसत नाहीत.