भिवंडी : सवाद ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उभारण्यात आलेले, अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज असलेले ८१८ बेडचे जिल्हा कोविड रुग्णालय तयार झाले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
सध्या कोरोना आटोक्यात असला, तरी हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारस्तरावर योग्य ती खबरदारी घेत सवाद येथे रुग्णालय उभारण्यात आले आहे. यामध्ये पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र प्रत्येकी ३६० बेडसह ८० बेड आयसीयू सुविधा असलेले बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रुग्णालयात आवश्यक असलेल्या सर्वच ठिकाणी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली. हे अद्ययावत रुग्णालय भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपयोगी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, नायब तहसीलदार महेश चौधरी यासह सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात सध्या कोरोना आटोक्यात आला असला, तरी युरोपसह भारतातील काही भागांत कोरोनाची दुसरी लाट पुन्हा नव्याने पसरत आहे.