लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोरोना रुग्णांकडून जादा बिल वसुली करणे तसेच याबाबत केडीएमसीने चौकशी केली असता त्यांनाही खोटी बिले सादर करून दिशाभूल केल्याप्रकरणी केडीएमसीने पश्चिमेतील सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी या खाजगी कोविड रुग्णालयाचा कोविड परवाना रद्द केला आहे. या रुग्णालयाची नोंदणी ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत रद्द केली आहे. दरम्यान, यापूर्वीही मनपाने अशा प्रकारची कारवाई करून रुग्णालयांकडून जादा बिलाची रक्कम वसूल करून ती रक्कम संबंधित रुग्णांना परत केली आहे.
केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी ही कारवाई केली आहे. सिद्धिविनायक या २० खाटांच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयास मनपाने कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला होता. या रुग्णालयाने रुग्णांकडून सरकारी दरानुसार बिल न आकारता जादा बिल घेतले. त्यामुळे मनपाने चौकशी करताच त्यांनाही खोटी बिले सादर करून योग्य बिले आकारल्याचा बनाव केला. बिलातील अनियमितता लपवून ठेवली.
या प्रकरणी १० आॅगस्टला मनपाने रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, त्याचा खुलासा रुग्णालयाने केला नाही. त्यामुळे पुन्हा ११ सप्टेंबरला बिलबुक सादर करण्याचे आदेश रुग्णालयास मनपाच्या वित्त व लेखा विभागाचे प्रमुख सत्यवान उबाळे यांनी दिले होते.रुग्णालयाने रुग्णास वेगळी बिले दिली; तर, मनपाला सादर केलेली बिले वेगळी होती. सर्वसामान्य कोविड रुग्णांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मनपाने ही कारवाई केली आहे. रुग्णांना आकारलेल्या जादा बिलाची रक्कम रुग्णालयाने परत करून अनियमितता दूर करावी. जोपर्यंत रुग्णालयाकडून बिलाची रक्कम रुग्णांना परत केली जात नाही, तोपर्यंत रुग्णालयाची नोंदणी रद्दच राहणार आहे.
पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नियंत्रणकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या या कारवाईपश्चात रुग्णालयाने नव्याने कोविड रुग्ण दाखल करून घेऊ नये, तसेच जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांच्या बिलाची शहानिशा करून त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करावेत, यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांना देण्यात आले आहेत.