कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी शाळेत ३१० बेडची क्षमता असलेले कोविड रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.
या कोविड रुग्णालयात सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. ते कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तयार करण्यास घेतले होते. ते तयार करून झाल्यावर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे ते वापरात आले नव्हते. आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती संख्या पाहता एनआरसी शाळेतील कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून नव्याने सुरू करण्यात आली. हे कोविड रुग्णालय वापराविना पडून आहे याकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ते सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी रामदास वळसे पाटील यांनी नुकतीच डॉ. पाटील यांची भेट घेऊन एक निवेदन दिले. ते प्राप्त झाले असले तरी हे रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते सुरू होईल. केवळ ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटर बेडची सुविधा करण्याचे काम बाकी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची कोविड सेंटर ही कल्याण व डोंबिवली शहर केंद्रित आहेत. मात्र, टिटवाळा येथे रुक्मिणीबाई प्लाझा येथे कोविड सेंटर सुरू केले आहे. परंतु, मोहने, आंबिवली, वडवली, आटाळी, गाळेगाव या परिसरातील रुग्णांसाठी एनआरसी शाळेतील कोविड रुग्णालय उपयुक्त ठरू शकते. त्यांना कल्याण डोंबिवली या ठिकाणी धाव घेण्याची वेळ येणार नाही.
--------------