डोंबिवली : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. मात्र, सरकारी, खासगी रुग्णालयांतील बेड तीन दिवसांपासून फुल झाल्याने बेड मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे रुग्णासाठी बेड मिळवण्यात नातेवाइकांची दमछाक हाेत आहे. सगळीकडून नकार येत असल्याने काय करावे, हे त्यांना सुचेनासे झाल्याचे दिसत आहे.
शहरातील शास्त्रीनगर, जिमखाना ही महापालिकेची रुग्णालये, तर बाज आर आर, आस्था, आयकॉन, एम्स यांसह अन्य खासगी इस्पितळांतही बेड फुल झाल्याने नव्याने येणाऱ्या रुग्णांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अनेकांना ऑक्सिजनची गरज असल्याने रुग्णालयात दाखल हाेणे गरजेचे आहे. जागाच नसल्याने अशा रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ओळखींतूनही बेड मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. अशीच गंभीर स्थिती राहिली तर शहराची सध्या असलेली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडणार असल्याची भीती वैद्यकीय जाणकारांनी व्यक्त केली.
ऑक्सिजनचे बाटले रिकामे
बहुतांशी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बाटले रिक्त झाल्याने ते पुन्हा भरण्यासाठीही सुविधा नसल्याने रुग्णालय प्रशासनासमोर रुग्णांना उपचार कसे द्यायचे हा मोठा प्रश्न आहे. याबाबत तातडीने काही उपाययोजना झाल्या नाहीत तर ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्यावर इलाज करणे कठीण होणार असल्याचे सांगण्यात आले.
--------